खड्ड्यांमुळे महिलेची रिक्षात प्रसूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 12:04 AM2017-11-01T00:04:42+5:302017-11-01T00:04:56+5:30
गारज-देवगाव रंगारी मार्गावर मंगळवारी दुपारच्या सुमारास खड्ड्यांमुळे गर्भवती महिलेची रिक्षातच प्रसूती झाल्याची घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वैजापूर : तालुक्यातील गारज-देवगाव रंगारी मार्गावर मंगळवारी दुपारच्या सुमारास खड्ड्यांमुळे गर्भवती महिलेची रिक्षातच प्रसूती झाल्याची घटना घडली. सदर महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला; मात्र काही वेळेतच सदर बालकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पुन्हा येथील रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासन रस्त्याची दुरुस्ती हाती घेईल, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी दुपारी १२ वाजता तालुक्यातील गारज येथून चेहंदीबाई कृष्णा मोर (रा. सेंदवा, मध्यप्रदेश, ह.मु. जांबरखेडा) ही सहा महिन्यांची गर्भवती महिला देवगाव रंगारी येथे डॉक्टरांकडे तपासणीसाठी जात होती; मात्र रस्त्यावरील असंख्य खड्ड्यांमुळे जांबरखेडा फाट्यावर सदर महिला रिक्षातच प्रसूत झाली. या प्रकारामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराविरोधात सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.
दरम्यान, तत्पूर्वी सकाळी सदर महिलेला गारज येथे डॉक्टरांकडे तपासणीसाठी नेण्यात आले होते; मात्र येथील डॉक्टरांनी तपासणीला देवगाव रंगारी येथे नेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे पतीने चेहंदीबाईला देवगाव रंगारीला जाण्यासाठी अंकुश साळुंके यांच्या रिक्षात बसवले; मात्र गारज ते देवगाव रंगारी या सात कि.मी अंतरात मोठे खड्डे असल्याने रिक्षा आदळून सदर महिला रिक्षातच प्रसूत झाली.
यावेळी नवजात शिशूला वेळेवर उपचार न मिळाल्याने व सहाव्या महिन्यातच प्रसूत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयापासून खेडेगावापर्यंत जागोजागी सरकारी आरोग्य यंत्रणेचे जाळे निर्माण करण्यात आलेले आहे; मात्र हे जाळे कधीच विरले असून, सर्वसामान्यांना आरोग्य सेवेसाठी खासगी ठिकाणी उंबरे झिजवण्याची वेळ आली आहे.
सरकारने आतापर्यंत गरोदर माता, जन्माला येणारे बालक, अंगणवाडी बालक, शालेय बालक ते महाविद्यालयीन तरुणांपर्यंत वेगवेगळ्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत; मात्र या योजना केवळ कागदोपत्रीच सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.