पाच शक्ती उपपीठांमुळे औंढ्यात भक्तांची रीघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:33 AM2017-09-26T00:33:19+5:302017-09-26T00:33:19+5:30
येथे पाच शक्ती उपपीठांचे स्थान असल्यामुळे नवरात्रोत्सव काळात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असल्याने नवरात्रात येथे विशेष महत्त्व प्राप्त होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : येथे पाच शक्ती उपपीठांचे स्थान असल्यामुळे नवरात्रोत्सव काळात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असल्याने नवरात्रात येथे विशेष महत्त्व प्राप्त होते.
देशात ५२ शक्तिपीठे असून यामधील साडेतीन पीठे महाराष्टÑात आहेत. यामध्ये सोलापूर, माहूर, तुळजापूर असे तीन पूर्ण पीठ तर नाशिकजवळील सप्तश्रृंगी हे अर्धे पीठ आहे. या पिठातील उपपीठे ही अनेक ठिकाणी विराजमान आहेत.
औंढा नागनाथ येथे भक्तांची आई म्हणजेच पार्वतीमाता, चंद्रपूरच्या देवीचे स्वरूप मानले जाते. या भक्ताच्या आईचा झेंडा नागनाथ मंदिरात पोहोचल्याशिवाय पालखी सोहळ्यास सुरूवात होत नाही.
किंबहुना भक्ताच्या आईस पार्वतीचे रूप मानले जाते. नागनाथ मंदिराच्या पूर्व बाजूस कालिका मातेचे मंदिर विराजमान आहे. कोलकाता येथील महाकाली देवीचे स्वरूप येथे अस्तित्वात असल्याचे संबोधल्या जाते.
कनकेश्वरी मातेचे मंदिर नागनाथ मंदिरापासून पूर्वेस १ कि.मी. अंतरावर आहे. तिन्ही बाजूस तलावाचे पाणी, निसर्गरम्य वातावरणात या देवीच्या दर्शनाने मन प्रसन्न होते. तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचेच हे स्थान असल्याची आख्यायिका ऐकावयास मिळते.
औंढ्याहून दक्षिणेस हिंगोली-परभणी महामार्गावरील खांडेश्वरी देवीचे मंदिर हे नेहमीच भक्तांनी गजबजलेले असते. माहूरच्या रेणुकामातेच्या स्वरूपात खांडेश्वरी माता या ठिकाणी विराजमान आहे. तसेच औंढा नागनाथ येथून पश्चिमेस ३ कि.मी. अंतरावर पद्मावती देवीचे मंदिर माळरानाच्या कुशीत विराजमान आहे. पद्मावती मातेला कोल्हापूरची महालक्ष्मी माता संबोधली जाते. त्यामुळे नवरात्र उत्सव काळात या ठिकाणी घटस्थापना केल्या जात असून, भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असते.
येथील कालिका देवीच्या दर्शनाने महाकालीचे दर्शन, कनकेश्वरीच्या दर्शनाने तुळजाभवानीचे दर्शन, खांडेश्वरीच्या दर्शनाने रेणुका मातेचे दर्शन, पद्मावतीच्या दर्शनाने महालक्ष्मी मातेचे दर्शन तर भक्ताच्या आईच्या दर्शनाने चंद्रपूरच्या आईचे दर्शन लाभते. या पाचही देवींचे दर्शन घेतल्यानंतर विशेष पुण्य प्राप्त होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.