वाळूज महानगरात ‘महसूल’च्या कारवाईमुळे वाळूमाफियांत खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 05:52 PM2018-11-07T17:52:34+5:302018-11-07T17:53:16+5:30
वाळूमाफियांसह जमीनमालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
वाळूज महानगर : चार दिवसांपूर्वी महसूल विभागाच्या पथकाने वाळूज परिसरात ठिकठिकाणी छापे मारून वाळू तस्कर व जमीन मालकांविरुद्ध गुन्हे दाखल केल्यामुळे वाळूमाफियांत खळबळ उडाली आहे. वाळूमाफियांसह जमीनमालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
गंगापूरचे तहसीलदार डॉ. अरुण जºहाड यांनी ४ नोव्हेंबरला धामोरी, लांझी, शिवराई, विटावा आदी भागात अचानक छापे टाकले होते. या कारवाईत परिसरातून जवळपास ५०० ब्रॉस वाळूची चोरी झाल्याचे निष्पन्न झाले होते. याप्रकरणी महसूल विभागानेवाळूज परिसरात गट नंबर २१० मध्ये छापे मारून मीनाबाई अहिरे, मुरलीधर केदारे (रा. वाळूज), अनिस शेख (रा. नारायणपूर) आदींनी १०० ब्रॉस वाळू चोरी केल्याचा पंचनामा केला होता.
धामोरी शिवारातील गट नंबर ७८ मधून रामेश्वर शेळके, कृष्णा शेळके (रा. धामोरी) नंदू शेळके, अनिल जमधडे (रा. वाळूज) व गट नंबर ८४ मधून चांगदेव हाडोळे, गट नंबर ८५ मधून अंकुश शेळके व अनिल जमधडे, गट नंबर ८७ मधून अशोक शेळके, तर गट नंबर ६१ मधून निवृत्ती हाडोळे, लांझी शिवारातील गट नंबर ९ मध्ये नितीन साबळे व नाथा शेळके (रा. दोघे शिवराई), बाबासाहेब क्षीरसागर, शकुंतला क्षीरसागर, सोन्या ऊर्फ प्रशांत चौरे (रा. वाळूज) आदींचा वाळू चोरीत सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या सर्वांच्या विरोधात वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विशेष बाब म्हणजे तहसीलदार डॉ. अरुण जऱ्हाड यांच्यावर वाळूमाफिया पाळत ठेवत असून, त्यांच्या शासकीय वाहनाचा पाठलाग करणाऱ्या सोन्या ऊर्फ प्रशांत चौरे, विनोद कीर्तिशाही यांच्याविरुद्ध तहसीलदार जºहाड यांनी तक्रार दिली आहे.
वाळूमाफियांना पोलिसांचे अभय
वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वाळूची चोरटी वाहतूक बिनधास्तपणे सुरू असते. वाळूज पोलीस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी यांचे वाळू तस्करांशी साटे-लोटे असल्यामुळे या परिसरातून वाळूची चोरटी वाहतूक सुरू आहे. वाळूमाफियांकडून महिन्याकाठी मोठी ‘वरकमाई’ होत असल्यामुळे त्यांना अभय दिले जात असल्याची चर्चा सुरू आहे.