वाळूज महागनरावर भीषण पाणीटंचांईचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 23:18 IST2019-04-10T23:18:28+5:302019-04-10T23:18:38+5:30
वाळूजमहानगर परिसरात भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली असून, विकतच्या पाण्यावर आगामी दोन महिने भिस्त राहणार आहे.

वाळूज महागनरावर भीषण पाणीटंचांईचे संकट
वाळूज महानगर : वाळूजमहानगर परिसरात भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली असून, विकतच्या पाण्यावर आगामी दोन महिने भिस्त राहणार आहे. यामुळे खाजगी टँकर चालकांची चांदी होत असून, जारलाही मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गावा-गावातील पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याने सर्वसामान्यांना पाण्यासाठी अर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
परिसरातील वडगाव कोल्हाटी, तीसगाव, साजापूर, पंढरपूर, वाळूज, रांजणगाव, घाणेगाव, कमळापूर आदी गावांतील रहिवाशांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाझर तलाव कोरडेठाक पडले असून, विहिरी व बोअरच्या पाणी पातळीतही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे गावा-गावातील पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडत चालले असून नागरिकांना तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बहुतांश गावात आठ ते दहा दिवसांआड पाणी पुरवठा केला जात आहे. त्यातही कमी दाबाने व अत्यल्प पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
टेंभापुरी मध्यम प्रकल्प, वडगाव, तीसगाव, साजापूर येथील पाझर तलावात अपेक्षित जलसाठा न झाल्यामुळे नागरिकांना डिसेंबरपासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यातच भारनियमन तसेच तांत्रिक दोष निर्माण झाल्यास ग्रामपंचायतीकडून होणार पाणी पुरवठा बंद पडत असल्यामुळे नागरिकांच्या अडचणीत भर पडत आहे.