सोयाबीनचे पीक किडीमुळे धोक्यात
By Admin | Published: September 14, 2015 11:26 PM2015-09-14T23:26:22+5:302015-09-15T00:29:15+5:30
बीड : गत आठवड्यात जिल्ह्यात पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांनी काही भागात तग धरली आहे. मात्र आता सोयाबीनच्या पिकावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव
बीड : गत आठवड्यात जिल्ह्यात पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांनी काही भागात तग धरली आहे. मात्र आता सोयाबीनच्या पिकावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे जिल्ह्यातील १ लाख ५३ हजार हेक्टरवरील सोयाबीन धोक्यात आले आहे. सोमवारी कृषी उपसंचालक बी.एम. गायकवाड यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सोयाबीन पिकाची पाहणी केली. यावेळी हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले.
सलग तीन वर्षांपासूनच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची पुरती वाताहत झाली आहे. उशिराने का होईना पाऊस पडल्यामुळे अंबाजोगाई, माजलगाव, केज, बीड या तालुक्यात सोयाबीनचे पीक काही प्रमाणात आले आहे. मात्र आता हुमणी अळीचा प्रादुर्भाव सोयाबीनवर होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सोमवारी गायकवाड यांनी माजलगाव तालुक्यातील आबेगाव येथील शेतकऱ्याच्या सोयाबीनची पाहणी केली असता तेथे हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले. अशीच परिस्थिती अंबाजोगाई, बीड व केज तालुक्यात आहे.
नेमके यावर्षी जूनच्या सुरुवातीला पाऊस झाला नसल्याने हुमणी अळीला पोषक वातावरण निर्माण झाल्याने आता सोयाबीनचे पीक धोक्यात आहे. विशेषत: हलक्या व कमी पाण्याच्या जमिनींमध्ये असलेल्या सोयाबीनला जास्त प्रमाणात ही कीड लागलेली असल्याचे आढळून येत आहे. निंदणी आणि कोळपणीच्या वेळी शेतातील अळ्या वेचून नष्ट करणे आवश्यक आहे. याशिवाय जमिनी ४८ १० टक्के किंवा फिफ्रोनिल ३ टक्के किलो प्रती हेक्टर याप्रमाणे द्यावे. झाडावरचे भुंगेरे रात्री ८ ते ९ वाजता बांबुच्या काठीच्या साह्याने झाडाच्या फांद्या हलवून खाली पाडावेत आणि ते गोळा करुन रॉकेलमिश्रित पाण्यात टाकून त्या नष्ट कराव्यात, प्रादुर्भाव क्षेत्रातील शेतकऱ्यांनी सामुदायिकपणे करणे गरजेचे आहे.
अशाप्रकारे हुमणी अळीला सामूहिकरीत्या प्रयत्न करुन नष्ट केले तरच नियंत्रण करणे शक्य आहे. (प्रतिनिधी)