वादळी वारा आणि पावसाच्या तडाख्याने शहर पाच तास बुडाले अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 01:06 PM2019-06-10T13:06:01+5:302019-06-10T13:11:34+5:30
१३२ केव्ही वाहिनीचे अर्थिंग वायर तुटल्याने महावितरणच्या ३३ केव्हीची ५ उपकेंद्रे बंद झाली.
औरंगाबाद : शहरात रविवारी दुपारी वादळी वाऱ्याला आणि पावसाला सुरुवात होताच शहरातील विविध भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. शहरात दुपारी ४ वाजेच्या सुमारास खंडित झालेला वीजपुरवठा रात्री ८.३० वाजेपर्यंतही सुरळीत झालेला नव्हता. त्यामुळे शहर अंधारात बुडाले होते.
शहरात दुपारी ४.२० वाजता महापारेषण कंपनीच्या हर्सूल ते चिकलठाणा या १३२ केव्ही वाहिनीचे अर्थिंग वायर तुटल्याने महावितरणच्या ३३ केव्हीची ५ उपकेंद्रे बंद झाली. त्यामुळे संपूर्ण चिकलठाणा, सिडको, नारेगाव परिसरात वीजपुरवठा खंडित झाला. सायंकाळी ७ वाजता ३३ केव्ही उपकेंद्रांचा वीजपुरवठा सुरू झाला. मात्र, अनेक ठिकाणी ११ केव्ही वाहिन्यांवर झाडे कोसळल्याने सिडकोतील बहुतांश भागात रात्री ८.३० वाजेपर्यंत अंधार होता. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरुस्तीची कामे करून एन-५ चा वीजपुरवठा सुरू केला, तर चिकलठाणा परिसरात इंडस्ट्रियल ३ वाहिन्या व इतर ३ वाहिन्या वगळता एन-१, एन-२ सिडको, मुकुंदवाडी, एन-३, एन-४ चा वीजपुरवठा सुरळीत के ला. घरावरील पत्रे झाडे व वाहिन्यांवर कोसळल्याने हर्सूल, शहागंज, सिटीचौक, कटकटगेट परिसरातही वीजपुरवठा खंडित झाला होता.
पाणचक्कीसमोर ३३ केव्ही वाहिनीवर झाड कोसळल्याने पॉवर हाऊस उपकें द्र्र बंद पडले होते. त्यामुळे समर्थनगर, औरंगपुरा, गुलमंडी, निराला बाजार, बसस्थानक रोड, म्हाडा कॉलनीचा वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणने झाड काढून दुरुस्तीचे काम केल्याने सायंकाळी ६ वाजता वीजपुरवठा सुरू झाला. नक्षत्रवाडी, सातारा परिसर, गारखेडा भागातही वीजपुरवठा खंडित झाला होता. काही ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत झाला. हानी जास्त असल्याने अनेक ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांची उशिरापर्यंत कसरत सुरू होती. अनेक भागांतील वीजपुरवठा रात्री उशिरा सुरळीत होणार असल्याची माहिती महावितरणकडून नागरिकांना दिली जात होती.
साहेब, लाईट केव्हा येणार?
क्रांतीचौक, निराला बाजार, एन-८, एन-६, जटवाडा रोड, टीव्ही सेंटरसह विविध भागांत अंधार पसरला होता. शहरातील विविध नागरिक महावितरणच्या नियंत्रण कक्षाला संपर्क करून साहेब, लाईट केव्हा येणार, अशी विचारणा करीत होते. मात्र, त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नव्हते. पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्या तोडण्याची कामे आणि खबरदारीच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाल्याचे रविवारच्या घटनेवरून स्पष्ट झाले. एक प्रकारे महावितरणचा कारभार उघडा पडल्याचे म्हणत नागरिकांनी संताप व्यक्त केला.