थातूरमातूर डागडुजीमुळे औरंगाबाद-जालना महार्गावर पुन्हा खड्डडेच खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 12:13 PM2021-08-23T12:13:30+5:302021-08-23T12:17:03+5:30
Potholes on Aurangabad - Jalana Highway : औरंगाबाद-जालना महामार्गावरील शेंद्रा ते शेकटा हा 15 किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे.
- श्रीकांत पोफळे
करमाड (औरंगाबाद ) : मागील २ ते ३ वर्षांपासून औरंगाबाद-जालना महामार्गाची ( Aurangabad - Jalana Highway) पक्या स्वरूपात डागडुजी झालेली नाही. त्यात मागच्या वर्षी या परिसरात विक्रमी पाऊस झाला. यामुळे या महामार्गाची पूर्णतः चाळणी झाली होती. दरम्यान, मागील पंधरवाड्यापासून विकासक यंत्रणेकडून सुरू असलेली डागडुजी हा देख्याव्याचा फार्स ठरत असल्याचे चित्र आहे. कारण, ही दुरूस्ती म्हणजे पुढे पाठ मागे सपाट अशी ठरत आहे.
औरंगाबाद-जालना महामार्गावरील शेंद्रा ते शेकटा हा 15 किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. यावर पडलेल्या मोठ-मोठया खड्यामुळे दररोजच लहान-मोठे अपघात घडतात. यातच पडलेल्या खडड्याची डागडुजी होत नसल्याने पाणी साचून हे खड्डे धोकादायक बनत चालल्याने ते तात्काळ बुजवावे, अशा आशयाचे निवेदन औरंगाबाद तालुका भारतीय जनता युवा मोर्चा शाखेच्या वतीने 17 जुलैला टोल व्यवस्थापकांना देण्यात आले. ही बाब आमदार हरिभाऊ बागडे ( Haribhau Bagade ) यांच्याही कानावर घातली. आ. बागडे यांनी यावेळी कार्यकर्त्यां समोरच संबंधितांचे चांगलेच कानही उपटले होते. पुढील चार दिवसांत सदरील दुरूस्तीचे काम हाती न घेतल्यास टोल नाक्यावर बस्तान मांडुन टोल वसुली बंद करण्यात येऊन आंदोलन करण्याचा इशाराही बागडे नानांनी दिला होता.
यावरून औरंगाबाद-जालना टोलवेज या विकासक कंपनीने आंदोलनाचा धसका घेत सर्वांत जास्त खड्डे पडलेल्या करमाड बसस्थानकाच्या आजुबाजुचे खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजवुन वेळ मारून नेली. त्यानंतर कॅम्ब्रीज ते शेकटा गावापर्यंत पडलेल्या खड्ड्याचे पॅचवर्कचे काम करण्यात आले. आजही काही ठिकाणी हे काम सुरूच आहे. दरम्यान, या कामावेळी फक्त मोठ-मोठे खड्डे व चाळणी झालेल्या भागाचेच पॅचअप करण्यात आले. उर्वरित ठिकाणी मागील चार-पाच दिवसाच्या भिजपावसाने नव्याने खड्डे पडले आहेत तर पॅचअप केलेल्या काही ठिकाणीही पुन्हा थिगळे देण्याची वेळ येणार असल्याने संपूर्ण महामार्गाचे पक्के लेअर देऊन डांबरीकरण करण्याची मागणी वाहनधारकांतुन होत आहे.
तथापि, डागडुजी दरम्यान करमाड बसस्थानका शेजारील तात्पुरत्या स्वरूपातील बुजवलेल्या खड्ड्यांची डागडुजी झालीच नाही. त्यामुळे आता हा रस्ता खड्ड्यात हरवला आहे. या ठिकाणी आजमितीस चार बाय तीन लांबीचे तर दोन-दोन फुट खोलीचे भयावह खड्डे पडलेलेे दिसुन येते. या ठिकाणी दररोजच किरकोळ अपघात व कित्येक वाहनांचे टायर फुटण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहे. इतर ठिकाण सारखी डागडुजी तातडीने करण्यात यावी अशी मागणी करमाडचे सरपंच कैलास उकर्डे, माजी सरपंच दत्ता उकर्डे, रविकुमार कुलकर्णी, योगेश कुलकर्णी व ग्रामस्थांतर्फे करण्यात आली आहे.