अव्वल कारकुनाच्या आत्महत्येच्या धमकीने प्रशासनाची उडाली भितीने गाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 12:00 AM2018-10-25T00:00:13+5:302018-10-25T00:01:14+5:30
जिल्हा महसूल प्रशासनाने जून महिन्यात अव्वल कारकून, लिपिक, तलाठी, मंडळ अधिकारी संवर्गातील केलेल्या बदल्यांमुळे अनेक कर्मचारी अस्वस्थ असून, त्याचा भडका बुधवारी उडाला.
औरंगाबाद : जिल्हा महसूल प्रशासनाने जून महिन्यात अव्वल कारकून, लिपिक, तलाठी, मंडळ अधिकारी संवर्गातील केलेल्या बदल्यांमुळे अनेक कर्मचारी अस्वस्थ असून, त्याचा भडका बुधवारी उडाला. अव्वल कारकून राजेंद्र बागडे यांनी आत्महत्या करीत असल्याचे धमकीपत्र सोशल मीडियात व्हायरल झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाची भीतीने गाळण उडाली.
जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सोयगाव येथे केलेल्या बदलीला स्थगिती मिळावी, यासाठी बागडे यांनी मॅट, कोर्टातून स्थगिती मिळविल्यानंतरही त्यांची बदली रद्द झाली नाही. न्यायालयीन आदेशांना प्रशासन जुमानत नसल्याच्या वैतागातून त्यांनी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना आत्महत्या करीत असल्याचे हस्तलिखित पत्र दिले. ते पत्र त्यांनी जिल्हाधिकारी चौधरी यांच्यासह महसूल प्रशासनाच्या सोशल मीडिया गु्रपमध्येही व्हायरल केले. पत्रात बागडे यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदारांच्या त्रासामुळे आत्महत्या करीत असल्याचे लिहिले आहे. दरम्यान, प्रशासनासह कर्मचारी संघटना व नातेवाईकांनी त्यांचा दिवसभर शोध सुरू केला, तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी सिटीचौक पोलिसांनादेखील याप्रकरणी सूचना दिल्या. सायंकाळपर्यंत बागडे यांचा फोन न लागल्यामुळे मोबाईल ट्रॅकरद्वारे ते औरंगाबाद लेणी परिसरात असल्याचे लक्षात आले. महसूल अधिकारी, पोलिसांनी त्यांना तेथे समजावले. दरम्यान, त्यांना आकाशवाणी परिसरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे निवासी उपजिल्हाधिकारी संजय जाधवर आदींनी बागडे यांना समजाविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, बागडे यांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, आस्थापना अधिकारी, महसूल प्रशासनावर गंभीर आरोप केले. जिल्हाधिकाºयांसह प्रशासनातील कुणीही दाद देत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. याप्रकरणी जिल्हाधिकाºयांशी संपर्क होऊ शकला नाही.
एकूण कर्मचाºयांच्या तीस टक्के बदल्या करता येतात. ६५ मंडळ अधिकाºयांपैकी ३८ जणांच्या बदल्या केल्या. तेथे १८ जण बदलीसाठी पात्र होते. बदल्यांमुळे शासन आदेशाची पायमल्ली झाली आहे. ज्यांचे एक वर्ष सेवेचे उरलेले आहे. त्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. ३६ कर्मचाºयांचे मुख्यालय बदलण्यात आल्याचे मत संघटनेने व्यक्त केले. दरम्यान, महसूल कर्मचारी संघटनेचे सतीश तुपे, अनिल सूर्यवंशी यांनी या प्रकरणात जिल्हाधिकाºयांची भेट घेतली.
...तर बागडेंवर कारवाई होऊ शकते
आॅनलाईन फेरफार प्रलंबित ठेवल्याच्या तक्रारीसंदर्भात तत्कालीन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी चौकशी करून बागडेंना निलंबित केले होते. त्यावेळी बागडे यांनी जिल्हाधिकाºयांच्या निलंबन आदेशाला विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याकडून स्थगिती मिळविली. राम यांनी बागडेंच्या तक्रारीसंदर्भात सविस्तर अहवाल विभागीय आयुक्तांना पाठवून निलंबन कारवाई योग्यच असल्याचे म्हटले होते. डॉ. भापकर यांच्याकडे त्यावर सुनावण्या झाल्या. मात्र, अंतिम आदेश दिले नाहीत. आयुक्तांनी निर्णय दिला, तर प्रशासनाला वेठीस धरणे, शिस्तभंग केल्यावरून बागडे यांच्यावर कारवाई होऊ शकते. यासाठी जिल्हा प्रशासन गुरुवारी आयुक्तांना बोलणार आहे.
पोलिसांत बागडेविरोधात तक्रार
जिल्हा प्रशासनाने अव्वल कारकून बागडे यांच्या विरोधात सिटीचौक पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलीस निरीक्षक दादासाहेब शिनगारे यांनी सांगितले, याप्रकरणी जिल्हाधिकाºयांमार्फत तक्रार प्राप्त झाली आहे. अद्याप गुन्हा दाखल केलेला नसून, चौकशी अंती निर्णय होईल.