प्रखर हिंदुत्वामुळे शिवसेनेने माझ्या वडिलांचे खच्चीकरण केले; साधे लोकसभेचे तिकीटही दिले नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 07:30 PM2022-06-10T19:30:47+5:302022-06-10T19:33:12+5:30
भाजप आमदार अतुल सावे यांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार
औरंगाबाद : प्रखर हिंदुत्वामुळे शिवसेनेने माझे वडील स्व. मोरेश्वर सावे यांचे खच्चीकरण केले. हिंदुत्वामुळेच शिवसेनेने त्यांना साधे लोकसभेचे तिकीट देखील दिले नाही. बुधवारच्या जाहीर सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकच बाजू मांडली, दुसरी बाजू त्यांनी सांगावी, असे आव्हान देत आ.अतुल सावे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वक्तव्यावर अनेक प्रश्नचिन्हे उभी केली.
शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी बुधवारच्या सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढविला. अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यासाठी शिवसेनेचे कुणीही आले नव्हते, असे फडणवीस सांगतात; परंतु मी त्यांना आठवण करून देतो की, औरंगाबादेतून शिवसेनेचे माजी खा. स्व. मोरेश्वर सावे हे शिवसैनिकांसह अयोध्येला गेले हाते. त्यांचे चिरंजीव अतुल सावे हे सध्या भाजपचे आमदार आहेत. मी आ. सावेंना विचारतो, फडणवीसांना जाऊन सांगा, माझे बाबा अयोध्येला गेले होते नसेल गेले तर तसेही सांगा, असे मुख्यमंत्री जाहीर सभेत बोलल्याने गुरुवारी आ. सावे यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला उत्तर देताना सवाल केला. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी माझ्या वडिलांबाबत केलेले वक्तव्य दु:खद आहे. माझे वडील कारसेवक म्हणून अयोध्येला गेले होते. त्यांचे प्रखर हिंदुत्व शिवसेनेला आवडले नाही म्हणून त्यांचे वारंवार खच्चीकरण केले. त्यांना साधे लोकसभेचे तिकीटदेखील दिले नाही. लोकांनी त्यांना ‘धर्मवीर’ ही पदवी दिली, त्याचा देखील स्वीकार करण्यात शिवसेनेने आडकाठ्या आणल्या.
मुख्यमंत्र्यांनी पूर्ण कहाणी सांगावी
बुधवारच्या सभेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी अर्धीच कहाणी सांगितली. सावे यांना शिवसेनेने लोकसभेत उमेदवारी का दिली नाही, याचे उत्तरदेखील मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजे. प्रखर हिंदुत्ववादामुळेच शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली नाही. सावे कारसेवक म्हणून अयोध्येला जाताना, त्यांच्यासोबत रेल्वेने हजारो हिंदुत्ववादी बाबरी पतनासाठी अयोध्येत औरंगाबादेतून गेले होते. त्यावेळी शिवसेना, भाजप असा काही मुद्दा नव्हता. प्रखर हिंदुत्व एवढा एकच मुद्दा होता. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, शिवसेना, भाजप या पक्षसंघटनांचे कार्यकर्ते अयोध्येत गेले होते, असे आ.सावे म्हणाले.