कमी पावसामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुमारे सव्वालाख हेक्टर रब्बीचे क्षेत्र घटणार

By बापू सोळुंके | Published: October 20, 2023 07:53 PM2023-10-20T19:53:36+5:302023-10-20T19:54:06+5:30

कमी पावसाचा फटका : रब्बी क्षेत्र निम्मे होण्याचा अंदाज

Due to low rainfall, the area of Rabbi crops in Chhatrapati Sambhajinagar district will decrease | कमी पावसामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुमारे सव्वालाख हेक्टर रब्बीचे क्षेत्र घटणार

कमी पावसामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुमारे सव्वालाख हेक्टर रब्बीचे क्षेत्र घटणार

छत्रपती संभाजीनगर : कमी पावसामुळे जिल्ह्यातील खरीप हंगामाचे उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा खाली येणार असल्याचे सांगितले जात असतानाच आता रब्बीचे क्षेत्राही निम्मे होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. दिवसेंदिवस जमिनीतील ओलावा घटत असल्याने यावर्षी सुमारे सव्वा लाख हेक्टरवरील रब्बीचे क्षेत्र घटण्याचा अंदाज वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यावर्षी सरासरी पावसाच्या ८५ टक्केच पाऊस झाला शिवाय मुसळधार पाऊस न पडल्याने जिल्ह्यातील नदी, नाल्यांना एकही पूर गेला नाही. अल्प पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन निम्म्याहून अधिक घटेल असा अंदाज कृषितज्ज्ञ वर्तवित आहेत. सलग २१ दिवसांपेक्षा अधिक काळ पावसाने खंड दिलेल्या कृषी मंडळातील अनेक पिकांचा केवळ चारा झाला. दरवर्षी ऑक्टोबरनंतर शेतकरी रब्बी हंगामाची तयारी सुरू करीत असतात. ज्या शेतकऱ्यांकडे बाराही महिने सिंचन सुविधा आहेत, अशा शेतकऱ्यांचा रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी आणि अन्य पिके घेण्याकडे कल आहे. मात्र, शेतकऱ्यांचेही यंदा कमी पावसामुळे रब्बीचे पेरणी क्षेत्र निम्म्यापर्यंत घटणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. गतवर्षी सुमारे २लाख ५६ हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली होती. यावर्षी मात्र कमी पावसामुळे रब्बीच्या क्षेत्रात निम्मी अर्थात सव्वालाख हेक्टरची घट होणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील प्रमुख रब्बी पीक आणि प्रस्तावित क्षेत्र हेक्टरमध्ये
रब्बी ज्वारी--६०,४५०
गहू----४८५२०
मका---४७,४००
हरभरा---५४०६०
करडई---११७०
एकूण दुय्यम पिके-- ४५९४

अत्यल्प पावसाळ्यामुळे रब्बीच्या क्षेत्रात मोठी घट
यावर्षी पावसाळा कमी झाल्याने जमिनीची ओल दिवसेंदिवस कमी होत आहे. मागील वर्षीच्या पेरणी क्षेत्राच्या आधारे आम्ही यावर्षीच्या रब्बी क्षेत्र किती असेल याबाबतची माहिती वरिष्ठ कार्यालयास सादर केली आहे. या आकडेवारीच्या आधारे शासन स्तरावरून आपल्या जिल्ह्यासाठी बियाणे आणि रब्बीसाठी रासायनिक खतांचा कोटा मिळतो. गत वर्षभराच्या तुलनेत रब्बीच्या क्षेत्रात मोठी घट होण्याची स्थिती आहे. गव्हाऐवजी शेतकऱ्यांचा कमी पावसावर येणाऱ्या हरभऱ्याची पेरणी करण्याकडे कल असणार आहे.
- प्रकाश देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक.

 

Web Title: Due to low rainfall, the area of Rabbi crops in Chhatrapati Sambhajinagar district will decrease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.