‘मंगळा’मुळे स्थळ मिळेना, वयाने चार वर्षे लहान मुलासोबत ठरवले लग्न; पंगत बसली अन्...

By सुमित डोळे | Published: September 6, 2023 08:15 PM2023-09-06T20:15:28+5:302023-09-06T20:15:51+5:30

रोखला असाही बालविवाह : वऱ्हाडी जमले, जेवणाच्या पंगतीही बसल्या अन् पोलिस धडकले...

Due to 'Mangal', not getting a groom, arranged marriage with a four-year-younger boy; dinners going up and police come | ‘मंगळा’मुळे स्थळ मिळेना, वयाने चार वर्षे लहान मुलासोबत ठरवले लग्न; पंगत बसली अन्...

‘मंगळा’मुळे स्थळ मिळेना, वयाने चार वर्षे लहान मुलासोबत ठरवले लग्न; पंगत बसली अन्...

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : घरी अठरा विश्वे दारिद्र्य. त्यात २३ वर्षाच्या राणीला (नाव बदलले आहे) कुंडलीत मंगळ सांगितल्याने तिच्या लग्नाची चिंता आई- वडिलांना सतावत होती. त्यातच ओळखीतून बीड जिल्ह्यातील अठरा वर्षाच्या मुलाच्या जन्मगुणांमुळे लग्न जमू शकते, असे कळाले आणि मुलासोबत तिचे लग्न ठरवले गेले. रविवारी दुपारी १२ वाजता पुंडलिकनगरच्या कार्यालयात वऱ्हाडी जमले. जेवणाच्या पंगतीही बसल्या; पण तेवढ्यात बालकल्याण समिती आणि पोलिस धडकले. पोलिसांनी लग्न थांबवत कुटुंबांना समज देत सोमवारी बालकल्याण समिती समोर हजर राहण्याची नोटीस बजावली.

राणीचे वडील खासगी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात; परंतु, पत्रिकेतल्या अडचणीमुळे तिचे लग्न ठरत नव्हते. बीड जिल्ह्यातील एका ऊसतोड दाम्पत्याचा १८ वर्षांचा मुलगा सूरज (नाव बदलले आहे) बाबत त्यांना माहिती मिळाली. पत्रिकेसोबतच दोघांचे स्वभाव जुळून आले. ऊसतोडीवर जायचे असल्याने सूरजच्या घरच्यांनी लग्नासाठी घाई केली आणि पुंडलिकनगरच्या एका कार्यालयात ३ सप्टेंबरच्या मुहूर्तावर लग्नाचा सोहळा आयोजित करण्यात आला.

कायद्याने चूकच
बालकल्याण समितीच्या अध्यक्षा ॲड. आशा शेरखाने कटके यांना मुहूर्ताच्या दोन तास आधी असे लग्न लावले जात असल्याचा फोन आला. शेरखाने यांनी पोलिसांना कळविले. बाल संरक्षण अधिकारी कल्पना मोहिते, दीपक बाजरे, पुंडलिकनगरचे उपनिरीक्षक कल्याण शेळके, दामिनी पथकाच्या निर्मला निंभोरे यांनी तत्काळ कार्यालयात धाव घेतली. पोलिसांना पाहून पाहुण्यांची भंबेरी उडाली. हे कळताच नवऱ्या मुलाच्या कुटुंबाने परस्पर गावही गाठले. पोलिसांनी नातेवाइकांना कायदा समजावून सांगत लग्न थांबवले.

कायद्याविषयी जनजागृती हवी
लग्नासाठी मुलीचे वय १८ असावे, हे सर्वांना माहिती आहे; परंतु, मुलाचेही वय २१ बंधनकारक आहे, हेही नागरिकांनी लक्षात ठेवावे. चुकीचे लग्न लावल्यास मुलाच्या पालकांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.
-ॲड. आशा शेरखाने कटके, अध्यक्ष, बालकल्याण समिती.

Web Title: Due to 'Mangal', not getting a groom, arranged marriage with a four-year-younger boy; dinners going up and police come

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.