विमानसेवेमुळे ‘अब दिल्ली दूर नहीं’; वर्षभरात लाखांवर विमान प्रवास्यांची राजधानीत ये-जा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 05:43 PM2022-03-07T17:43:18+5:302022-03-07T17:44:32+5:30
मुंबई-औरंगाबाद-मुंबई मार्गावर प्रवाशांची संख्या लाखाच्या जवळ
औरंगाबाद : औरंगाबादहूनदिल्लीसाठी एअर इंडिया आणि इंडिगोची विमानसेवा सुरू आहे. या विमानसेवेमुळेदिल्लीला अवघ्या २ तासांत पोहोचणे शक्य झाले आहे. मागील वर्षभरात एक लाखांवर प्रवाशांनी दिल्लीला विमानाने ये-जा केली, तर मुंबई-औरंगाबाद-मुंबई मार्गावरील प्रवाशांची संख्या लाखाच्या जवळ आहे.
औरंगाबादहून सध्या दिल्ली, मुंबई आणि हैदराबादसाठी विमानसेवा सुरू आहे. कोरोनामुळे बंगळुरु आणि अहमदाबादची विमानसेवा खंडित झाली आहे. दिल्लीला जाण्यासाठी आजघडीला सचखंड एक्सप्रेस आहे. रेल्वेबरोबर दिल्लीसाठी हवाई कनेक्टिव्हिटीही उपलब्ध आहे. गतवर्षी सकाळच्या वेळेतही दिल्लीसाठी विमान सुरू झाले होते. त्यामुळे सकाळी दिल्लीला जाऊन सायंकाळी परतही येता येत होते. परंतु, तिसऱ्या लाटेमुळे दिल्लीचे सकाळचे विमान बंद झाले. सध्या सायंकाळीच विमान आहे. मुंबईसाठी रेल्वेची कनेक्टिव्हिटी आहे. त्याबरोबरच विमानानेही मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या आहे.
शहरातील आयटी आणि उद्योग क्षेत्रासह बंगळुरु येथे शिक्षण घेणाऱ्या, नोकरी करणाऱ्यांसाठी विमानसेवा महत्त्वपूर्ण ठरते. कोरोनामुळे ही विमान सेवा खंडित झाली होती. परंतु, पहिली लाट ओसरल्यानंतर ही विमानसेवा डिसेंबर २०२०मध्ये पुन्हा सुरू झाली होती. परंतु, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ही विमानसेवा पुन्हा बंद पडली. बंगळुरु विमानसेवेसह अहमदाबादसाठी विमानसेवा सुरू होण्याची प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागत आहे.
कनेक्टिंग फ्लाईटने गाठली ही शहरे
औरंगाबादेतून दिल्ली, मुंबईला विमानाने गेल्यानंतर कनेक्टिंग फ्लाईटने इतर शहरही गाठले जाते. गेल्या वर्षभरात चेन्नईला १२४१, कोलकाता येथे ४४७, जयपूर येथे ३४२ आणि वडोदरा येथे ३ प्रवाशांनी प्रवास केला.
बंगळुरुसाठी सुरू व्हावी पुन्हा विमानसेवा
बंगळुरुसाठी पुन्हा एकदा विमानसेवा सुरू होणे आवश्यक आहे. औरंगाबादहून बंगळुरूसाठी १८० आसनी विमान आठवड्यातून २ दिवस किंवा ७२ आसनी विमान आठवड्यातून ५ दिवस सुरू केले तर प्रवाशांची सुविधा होईल. त्याबरोबर हैदराबादला जाणारे विमान सध्या प्रवाशांनी भरून जात आहे. हैदराबादसाठी आता मोठे विमान सुरू करणे गरजेचे आहे, असे औरंगाबाद एअर कनेक्टिव्हिटी एव्हिएशन ग्रुपचे अक्षय चाबूकस्वार म्हणाले.
सन २०२१मधील विमान प्रवाशांची संख्या (येणारे आणि जाणारे एकत्रित)
शहर - विमान प्रवासी
दिल्ली - १,११,९३२
मुंबई - ९३,०१७
हैदराबाद - ३०,१६१
बंगळुरु - ६,९४१
अहमदाबाद - ४,१६७