खंडग्रास चंद्रग्रहणामुळे कोजागरीला दूध पळीभर घ्या; दुसऱ्या दिवशी प्या मनसोक्त
By प्रशांत तेलवाडकर | Updated: October 28, 2023 18:20 IST2023-10-28T18:19:59+5:302023-10-28T18:20:53+5:30
३७ वर्षांपूर्वी अशीच खगोलीय घटना घडली होती

खंडग्रास चंद्रग्रहणामुळे कोजागरीला दूध पळीभर घ्या; दुसऱ्या दिवशी प्या मनसोक्त
छत्रपती संभाजीनगर : येत्या शनिवारी दूध मसाला टाकून गरमागरम दूध पिण्याच्या इच्छेवर लगाम घालावा लागेल. कारण, नेमके शनिवारी (दि. २८) कोजागरीच्या रात्री खंडग्रास चंद्रग्रहण लागणार आहे. त्यामुळे वेध काळात प्रतिवर्षाप्रमाणे रात्रीच्या वेळी लक्ष्मी व इंद्राचे पूजन करुन मसालेदार दुधाचे नैवेद्य दाखविता येईल. मात्र, ग्रहणामुळे ते प्रसाद म्हणून केवळ चमचाभर दूध प्राशन करावे लागेल. मात्र, दुसऱ्या दिवशी रविवारी तुम्ही मनसोक्त मसाला दूध पिऊ शकता असे प्रवीण कुलकर्णी (गुरूजी) यांनी सांगितले.
ग्रहणाचा पर्वकाल कोणता
शनिवारी मध्यरात्री १.०५ ते २.२३ वाजेदरम्यान ग्रहणाचा पर्वकाल आहे. हा ग्रहण पर्वकाल १ तास २८ वाजे दरम्यानचा आहे.
वेधकाळात करा पूजा
दुपारी ३.१४ वाजेपासून ग्रहणाचा वेधकाळ सुरु होणार आहे. सायंकाळपासून ते मध्यरात्री १ वाजेदरम्यान लक्ष्मी व इंद्राचे पूजन करता येईल. याकाळात दुधाचा नैवेद्य दाखवून चमचाभर दूध प्राशन करता येईल. रविवारी (दि. २९) मसालेदार दूध तुम्ही मनसोक्त पिऊ शकतात.
कोजागरीला दूध प्यावे की नाही
ज्योतिषशास्त्रावर किती भरोसा ठेवायचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. काहीजण म्हणतील ग्रहण असल्याने कोजागरीला दूध प्यायचे नाही तर काहीजण म्हणतील ही खगोलीय घटना आहे, दूध पिण्याचा आणि या चंद्र ग्रहणाचा काही संबंध नाही. आता ते तुम्ही ठरवायचे की, काय करायचे काय नाही.
३७ वर्षांनंतर कोजागरीला ग्रहण
पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितल्यानुसार कोजागरीला चंद्र ग्रहण लागण्याची भौगोलिक घटना ३७ वर्षांपूर्वी घडली होती. १७ ऑक्टोेबर १९८६ रोजी कोजागरीला चंद्रग्रहण लागले होते.