उच्च न्यायालयाच्या तत्परतेमुळे कैद्याला देता आला वडीलांना अग्नीडाग, सुटी असताना सुनावणी
By प्रभुदास पाटोळे | Published: January 28, 2023 01:08 PM2023-01-28T13:08:56+5:302023-01-28T13:10:09+5:30
शिक्षेला तात्पुरती स्थगिती अन् कैद्याला १५ दिवसांचा तात्पुरता जामीन
औरंगाबाद : अवघ्या आठ दिवसांपूर्वी कारागृहात गेलेल्या कैद्याच्या वडीलांचे शुक्रवारी निधन झाले. मात्र, उच्च न्यायालयाच्या तत्परतेमुळे त्या कैद्याला त्याच्या वडीलांना अग्नीडाग देता आला. कैद्याच्या अर्जाची तात्काळ दखल घेऊन औरंगाबाद खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती रविंद्र घुगे यांनी शुक्रवारी रात्रीच सदर प्रकरण न्यायमुर्ती किशोर संत यांच्या खंडपीठाकडे वर्ग करुन शनिवारी सकाळी तातडीची सुनावणी ठेवली होती. शनिवारी (दि.२८) सुटी असताना खंडपीठाने सकाळी ८:३० वाजता तातडीने सुनावणी घेऊन वरीलप्रमाणे आदेश दिला. त्यामुळे त्या कैद्याला त्याच्या वडीलांचा अंत्यविधी व इतर धार्मीक विधी पार पाडता आले.
दुचाकींच्या अपघातात ‘मृत्यूस कारणीभूत’ ठरल्याच्या आरोपाखाली १९ जानेवारी २०२३ पासून कारावासाची शिक्षा भोगत असलेला कैदी प्रदिप अर्जून हवाळे (३३) याच्या वडीलांचे अवघ्या आठच दिवसात २७ जानेवारीला रात्री ८ वाजता निधन झाले. त्याला त्याच्या वडीलांच्या अंत्यविधीमध्ये सहभागी होता यावे यासाठी त्याने दाखल केलेल्या फौजदारी अर्जाची तात्काळ दखल घेत उच्च न्यायालयाने त्याच्या शिक्षेला १५ दिवसांची तात्पुरती स्थगिती (सस्पेन्ड) देऊन त्याला तात्पुरता जामीन मंजूर केला.
२ नोव्हेंबर २०१३ रोजी झालेल्या दोन दुचाकींच्या अपघातात रविंद्र विठ्ठल शिंदे यांचे निधन झाले होते. रविंद्रच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली जामखेडच्या प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी ३० मे २०१६ रोजी प्रदिप हवाळे याला दोषी ठरवून भादंविच्या कलम ३०४ (अ) अन्वये एक वर्ष सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंड ठोठावला होता. त्याने दंडाची रक्कम भरुन सत्र न्यायालयात अपील दाखल केले असता श्रीगोंदा सत्र न्यायालयाने १९ जानेवारी २०२३ रोजी त्याचे अपील खारीज केले होते. २०१६ पासून २०२३ दरम्यान तो जामीनावर होता. सत्र न्यायालयाच्या आदेशानंतर १९ जानेवारीला त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली होती.
प्रदिपने वरील दोन्ही आदेशांविरुद्ध खंडपीठात फौजदारी पुनर्वीलोकन अर्ज दाखल केला आहे. दरम्यान त्याच्या वडीलांचे निधन झाल्यामुळे त्याने दाखल केलेल्या फौजदारी अर्जावर खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला. प्रदिपच्यावतीने ॲड. कमलाकर सुर्यवंशी यांनी तर शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील राजेंद्र सानप यांनी काम पाहिले.
सुटीच्या दिवशी खंडपीठाने घेतली दुसऱ्यांदा सुनावणी
यापुर्वी न्या. रवींद्र घुगे आणि न्या. आणि न्या. अरुण पेडणेकर यांच्या खंडपीठाने १५ ऑगस्टला सुटीच्या दिवशी विशेष सुनावणी घेऊन दिलेल्या आदेशामुळे औरंगाबादचा बॅडमिंटनपटू प्रथमेश कुलकर्णी पुणे येथील ‘इंडिया ज्युनिअर इंटरनॅशनल ग्रँड प्रिक्स २०२२’ आणि नागपूर येथील ‘इंडिया महाराष्ट्र इंटरनॅशनल चॅलेंज २०२२’ या दोन आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकला होता.