शिवसेनेत उभी फुट पडली, दिग्गज गेले; दुसऱ्या फळीतील निष्ठावंतांना आता आमदारकीचे डोहाळे
By बापू सोळुंके | Published: August 20, 2022 06:37 PM2022-08-20T18:37:20+5:302022-08-20T18:37:50+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जिल्ह्यातील पाच आमदार गेले आहेत.
- बापू सोळुंके
औरंगाबाद : शिवसेनेतून बाहेर पडलेल्या शिंदे गटात जिल्ह्यातील पाच आमदारांसोबत त्यांचे समर्थक पदाधिकारीही गेले आहेत. यामुळे शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना पदे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पाच आमदार बाहेर पडल्याने त्यांच्या मतदारसंघातील दुसऱ्या फळीतील निष्ठावंतांना आता आमदारकीचे स्वप्न पडू लागले आहेत.
शिंदे गटासोबत कोण कोण गेले?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जिल्ह्यातील पाच आमदार गेले आहेत. या आमदारांचे समर्थक असलेले पक्षातील विविध पदाधिकारीही त्यांच्यासोबत गेले आहेत. यात जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, फुलंब्री तालुकाप्रमुख राजेंद्र ठोंबरे, माजी उपमहापौर तथा युवासेना राज्य उपसचिव राजेंद्र जंजाळ, कन्नड तालुकाप्रमुख केतन काजे, सिल्लोड तालुकाप्रमुख किशोर अग्रवाल, पैठण तालुकाप्रमुख अण्णासाहेब लबडे, उपजिल्हाप्रमुख विनोद बाेंबले, वैजापूर उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, शहराध्यक्ष राजेंद्र साळुंके.
उद्धव यांच्यासोबत कोण राहिले?
शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी आमदार किशनचंद तणवाणी, शहर संघटक राजू वैद्य, ज्ञानेश्वर डांगे, विश्वनाथ स्वामी, बाळासाहेब थोरात. माजी महापौर नंदू घोडेले.
विधानसभेला चित्र आणखी बदलणार
२०१९ साली झालेली विधानसभा निवडणूक शिवसेनेने भाजपसोबत युती करून लढविली होती. मागील निवडणुकीत शिवसेनेने सहा तर भाजपचे तीन आमदार विजयी होत जिल्ह्यातील सर्वच विधानसभेच्या जागा जिंकल्या होत्या. सेनेच्या सहापैकी पाच आमदार शिंदे गटात गेले. त्यांच्यासोबत समर्थकांनीही त्यांना पाठिंबा दिल्याने आगामी विधानसभा निवडणूक शिवसेनेसाठी जड जाण्याची शक्यता आहे. बंडखोर आमदारांच्या मतदारसंघापैकीत पैठण, सिल्लोड येथे शिवसेनेकडे ताकदवान उमेदवारच नसल्याचे बोलले जात आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेना कितव्या स्थानावर?
विधानसभा कितवा क्रमांक
पैठण- पहिल्या क्रमांकावर
वैजापूर- पहिल्या क्रमांक
कन्नड- पहिला क्रमांक
सिल्लोड- पहिला क्रमांक
औरंगाबाद-मध्य- पहिला क्रमांक
औरंगाबाद पश्चिम- पहिला क्रमांक
फुलंब्री-भाजप
औरंगाबाद पूर्व-भाजप
गंगापूर- भाजप
शिंदे गटाचे वर्चस्व असेल
आगामी निवडणुका या भाजपसोबत युती करूनच लढल्या जातील, असे संकेत वरिष्ठांकडून मिळालेले आहेत. जिल्ह्यातील सहापैकी पाच आमदार आमच्यासोबत आहेत. शिवाय सेनेसह विविध पक्षातील नेतेही शिंदे गटात प्रवेश करीत आहेत. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाचेच वर्चस्व असेल.
- राजेंद्र जंजाळ, जिल्हाप्रमुख शिंदेगट, शिवसेना.
शिवसेना दोन जागा अधिक जिंकेल
जिल्ह्यात गत विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे पाच आमदार विजयी झाले होते. आगामी विधानसभा निवडणुकीत या पाच जागांवर आमचे उमेदवार निवडून येतीलच, शिवाय गंगापूर आणि औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघही आम्ही जिंकू. यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेनेचे पारडे जड असेल.
- आ. अंबादास दानवे, शिवसेना जिल्हाप्रमुख विरोधी पक्षनेते