वाहतूक कोंडीमुळे सतत तू तू- मैं मैं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:07 AM2021-02-05T04:07:17+5:302021-02-05T04:07:17+5:30
चिंचोली लिंबाजी : बोरगाव-नागापूर-म्हैसघाट या रस्त्यावरील मुख्य बसथांब्यावर अवैध वाहतूक करणारे वाहनधारक व दुचाकीस्वार बेशिस्तपणे वाहने पार्किंग करीत असल्याने ...
चिंचोली लिंबाजी : बोरगाव-नागापूर-म्हैसघाट या रस्त्यावरील मुख्य बसथांब्यावर अवैध वाहतूक करणारे वाहनधारक व दुचाकीस्वार बेशिस्तपणे वाहने पार्किंग करीत असल्याने अनेकवेळा वाहतूक कोंडी होते. यातून मार्ग काढताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते. रस्त्यावर अतिक्रमणही वाढलेले आहे. शुक्रवारी आठवडी बाजार असल्याने वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत.
चिंचोली लिंबाजी ही मोठी बाजारपेठ असल्याने परिसरातील ४० खेड्यांतील नागरिकांची कायम वर्दळ असते. विशेषतः आठवडी बाजारच्या दिवशी वाहनाची संख्या वाढत असल्याने याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. या रस्त्यावरच मुख्य बसथांबा असल्याने अवैध प्रवासी वाहतूक करणारे वाहनधारकसुद्धा बेशिस्तपणे वाहने उभी करतात. कोरोनामुळे आठवडी बाजार बंद असल्याने वाहतुकीची वर्दळ मंदावली होती. मात्र, पुन्हा आठवडी बाजार पूर्ववत सुरू झाल्याने नागरिकांसह वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शुक्रवारी आठवडी बाजार असल्याने रस्त्यावरील मुख्य बसस्थानकावर वारंवार वाहतूक कोंडी झाल्याचे पुढे आहे. गर्दीतून वाहने काढताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत असल्याने वाहनधारकांत तू तू- मैं मैं झाली.
आठवडी बाजारात खरेदीसाठी आलेले नागरिक, व्यापारी यांनी आपली वाहने बिनधास्तपणे कुठेही उभी करून निघून जात असल्याने अडचणी वाढल्या आहेत.
------ बसस्थानकाला महूर्त लागेना -----------
याच रस्त्यावर गावाच्या पुढे एस.टी. बसथांब्यासाठी लाखो रुपये खर्चून बसस्थानक बांधण्यात आले. बसस्थानक पूर्ण होऊन २० वर्षे होत आले. मात्र, अद्यापपर्यंत एकही वेळा या बसस्थानकात एस.टी. बस थांबलेली नाही. विशेष म्हणजे, यावर्षी दुसऱ्यांदा लाखो रुपये खर्च करून दुरुस्तीसह रंगरंगोटी करण्यात आली. या बसस्थानकात बस जातच नसेल तर मग लाखो रुपयांची उधळपट्टी कशासाठी, असा प्रश्न निर्माण होत आहे. रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने उभे करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
---
चिंचोली लिंबाजीतील रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने उभी राहत असल्याने अशी वाहतूक कोंडी होत आहे.