हरिनामाच्या गजराने दुमदुमली पैठण नगरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:04 AM2021-07-21T04:04:07+5:302021-07-21T04:04:07+5:30
पैठण : आषाढी वारीला नाथांचे मंदिर बंद असल्याने पैठणची आषाढी एकादशी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना व भाविकांना मंगळवारी मंदिराच्या दरवाजावर ...
पैठण : आषाढी वारीला नाथांचे मंदिर बंद असल्याने पैठणची आषाढी एकादशी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना व भाविकांना मंगळवारी मंदिराच्या दरवाजावर माथा टेकून माघारी फिरावे लागले. कोरोनाचे संकट दूर करा, पायी वारी घडू द्या, असे साकडे वारकऱ्यांनी मंदिराबाहेरून मनोभावे हात जोडून आज नाथांना घातले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाथ मंदिर परिसरात वारकरी भाविकांनी गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले होते. दुसरीकडे मात्र मोठ्या संख्येने वारकरी व भाविकांच्या उपस्थितीने गोदाकाठ व मंदिर परिसर फुलून गेला होता. आषाढी सोहळ्यासाठी पंढरपूरला जाता न आलेले वारकरी पैठण येथे येऊन नाथांचे दर्शन घेतात. दर आषाढीला पैठण शहर वारकऱ्यांच्या उपस्थितीने गजबजून जाते. दिवसभरात लाखो भाविक नाथ मंदिरात नाथ समाधीवर माथा टेकवतात. परंतु यंदा कोरोना महामारीचे सावट असल्याने नाथ मंदिराचे दरवाजे भाविक व वारकऱ्यांसाठी बंद झालेले आहेत. असे असले तरी मोठ्या संख्येने वारकऱ्यांनी मंगळवारी मंदिराबाहेरून दर्शन घेतले. कोरोनाची परिस्थिती निवळून मंदिरात जाऊन दर्शन घेता येईल, अशी आस वारकऱ्यांना होती. मात्र तसे न झाल्याने वारकऱ्यांच्या पदरी निराशा पडली.
200721\img_20210720_184733.jpg
हरिनामाच्या गजराने दुमदुमली पैठण नगरी