CAPF exam: ९ लाखांसाठी डमी उमेदवार बनला अन् पडल्या हातात बेड्या
By राम शिनगारे | Published: February 2, 2023 08:30 PM2023-02-02T20:30:09+5:302023-02-02T20:31:22+5:30
एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल : परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मिळणार होते पैसे
औरंगाबाद : नऊ लाख रुपयांच्या बदल्यात परीक्षेत डमी उमेदवार बनून गेलेल्या युवकास सुरक्षारक्षकाने परीक्षा हॉलमध्ये अंगझडती घेताना पकडले. परीक्षेचा पेपर देण्याऐवजी त्याच्यासह परीक्षार्थीच्या हातात बेड्या पडल्याचा प्रकार शिपाईपदाच्या परीक्षेत बुधवारी घडला. या प्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविल्यानंतर आरोपींना अटक केल्याची माहिती निरीक्षक गौतम पातारे यांनी दिली.
अविनाश सजन गोमलाडू (२१, रा. शिवगाव, ता. वैजापूर) आणि विकास शाहूबा शेळके (२३, रा. टाकळी, ता. कन्नड) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय सशस्त्र पोलिस बल, एसएसएफमध्ये कॉन्स्टेबल, आसाम रायफल्समध्ये रायफल्समॅन आणि नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये शिपाई-२०२२ (पेपर १) पदासाठीची परीक्षा एमआयडीसी सिडकोतील आय ऑन डिजिटल झोन याठिकाणी बुधवारी सकाळी ९ ते १० वाजेच्या दरम्यान आयोजित केली होती. उमेदवारांना हॉल तिकीट पाहून हॉलमध्ये सोडण्यात येत होते. ८०० पैकी ५३३ परीक्षार्थी हजर होते. हॉलमध्ये सोडलेल्या उमेदवारांची अंगझडती घेण्यासाठी एका सुरक्षारक्षकास आतमध्ये पाठविले. सर्व उमेदवारांची अंगझडती घेताना एका परीक्षार्थीची संशयास्पदरीत्या हालचाल दिसली. तेव्हा त्या उमेदवाराची बारकाईने झडती घेतली तेव्हा त्याच्याकडे अत्याधुनिक यंत्र सापडले. हॉलतिकीटवरील फोटो वेगळाच आढळून आला. विकासच्या नावावर अविनाश डमी उमेदवार असल्याचे स्पष्ट झाले. अविनाशला थेट पोलिस ठाण्यात नेले. त्याठिकाणी केंद्राचे व्यवस्थापक वैभव पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक तपास निरीक्षक गौतम पातारे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक सचिन जाधव करीत आहेत.
हायटेक यंत्रसामग्री
डमी उमेदवार अविनाशची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे ४ हजार रुपये किमतीचे एटीएम ट्रान्समीटर, ब्लूटुथ डिव्हाईस, मख्खी एअर फोन, मोबाइल आढळून आला. त्याशिवाय मूळ उमेदवाराची कागदपत्रेही अविनाशकडे सापडली. हायटेक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तो बाहेरुन प्रश्नाची उत्तरे मागविणार होता. या कॉपीच्या प्रकारात टोळी कार्यरत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.