डमी बातमी चॉकलेट नको, मला सॅनिटायझर हवे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:02 AM2021-02-08T04:02:56+5:302021-02-08T04:02:56+5:30
औरंगाबाद : शाळेत जाण्यासाठी मुले निघाली की त्याच्याआधी शाळेचे ओळखपत्र, तासिकांनुसार वह्या आणि पुस्तके, पेन-पेन्सिल, बूट-सॉक्स सगळे निटनेटके आहे ...
औरंगाबाद : शाळेत जाण्यासाठी मुले निघाली की त्याच्याआधी शाळेचे ओळखपत्र, तासिकांनुसार वह्या आणि पुस्तके, पेन-पेन्सिल, बूट-सॉक्स सगळे निटनेटके आहे की नाही याची विद्यार्थी व्यवस्थितपणे पाहणी करून घ्यायचे. या यादीत आता मास्क आणि सॅनिटायझरची भर पडली असून, एक वेळ मुले चॉकलेट नको म्हणतील, पण सॅनिटायझर आणि मास्क मात्र आवर्जून हवेच अशी मागणी करीत आहेत.
कोरोनामुळे मुलांचे शैक्षणिक वर्ष पूर्णपणे ढवळून निघाले आहे. अनेक मुले शाळा सुरू होण्याची वाट पाहत होते. शाळा सुरू झाली आणि दप्तरामध्ये वह्या- पुस्तकांसोबत सॅनिटायझर ठेवण्याचे नवेच काम विद्यार्थ्यांच्या मागे सुरू झाले.
अर्थातच जवळपास सर्वच शाळांमध्ये ठिकठिकाणी सॅनिटायझर मशीन बसविण्यात आले आहेत; पण तरीही विद्यार्थ्यांनी स्वत:ची सुरक्षा म्हणून त्यांच्या सोबत सॅनिटायझरची एक छोटी बाटली ठेवावी, असेही काही शाळांमधून सुचविण्यात आले आहे. मास्क तर आता इतकी अनिवार्य गोष्ट झाली आहे की, पूर्वी मास्कशिवाय आपण शाळेत यायचो, याचाही जणू विद्यार्थ्यांना विसर पडला आहे.
चौकट :
जिल्ह्यातील शाळांची सद्य:स्थिती
- पाचवी ते आठवीच्या एकूण शाळा- २५०० पेक्षा अधिक
- विद्यार्थ्यांची उपस्थिती- ५० टक्क्यांपेक्षा कमी
- शिक्षकांची उपस्थिती- ९० टक्क्यांपेक्षा अधिक
चौकट :
एकही बाधित नाही
९ वी-१० वीच्या शाळा सुरू होऊन महिनाभरापेक्षा अधिक काळ उलटून गेला आहे. ५ वी ते ८ वीचे वर्गही आता काही दिवसांपासून सुरू झाले आहेत; परंतु शाळा, विद्यार्थी आणि पालक यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आतापर्यंत शाळेतून विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची एकही घटना जिल्ह्यात अधिकृतपणे नोंदविण्यात आलेली नाही. त्यामुळे शाळा सुरू होऊनही कोरोना मर्यादेतच राहिल्याचे सकारात्मक चित्र आहे.
विद्यार्थी म्हणतात-
१. पूर्वी आमच्या वर्गात ४० विद्यार्थी होते. आता हे विद्यार्थी दोन गटांत विभागण्यात आले आहेत. शाळेत ठिकठिकाणी सॅनिटायझर मशीन बसविलेले आहेत; पण तरीही आम्ही प्रत्येक जण आमच्यासोबत सॅनिटायझरची एक लहान बाटली आवर्जून ठेवतो.
गोकुळ सारडा
२. शाळेत गेल्यावर प्रत्येक विद्यार्थ्याला आधी स्वच्छ हात धुवावे लागतात. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याचे तापमान तपासले जाते आणि त्यानंतरच शाळेच्या आवारात प्रवेश करता येतो. मास्क आणि सॅनिटायझर याशिवाय शाळेत प्रवेश नाही. - मरिअम मिर्झा
३. रोज केवळ दीड तास शाळा असते आणि ती देखील एक दिवसाआड. शाळेत जाताना आता वह्या-पुस्तके, पेन-पेन्सिल हे साहित्य घेेणे जितके आवश्यक झाले आहे, तितकेच मास्क अनिवार्य आहे. सॅनिटायझर शाळेत ठिकठिकाणी असल्याने त्याची तेवढी सक्ती नाही.
- अंकित बिरारे