डमी ... शिष्यवृत्तीची परीक्षा आता २३ मे रोजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:02 AM2021-04-01T04:02:21+5:302021-04-01T04:02:21+5:30
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने इयत्ता पाचवीची उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती आणि इयत्ता आठवीची पूर्व माध्यमिक ...
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने इयत्ता पाचवीची उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती आणि इयत्ता आठवीची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती ही २५ एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आता २३ मे रोजी शिष्यवृत्ती परीक्षा होणार असून यामुळे काही विद्यार्थी नाराज झाले आहेत, तर काहींना दिलासा मिळाला आहे.
पूर्वनियोजित तारखेनुसार परीक्षा आता अवघी तीन आठवड्यांवर येऊन ठेपल्यामुळे विद्यार्थी जोमाने अभ्यासाला लागले होते. दरवर्षी प्रत्येक शाळेकडून आपापल्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी विशेष तासिका घेतल्या जातात. यामध्ये विद्यार्थ्यांचा कसून सराव करून घेतला जातो. यंदा मात्र शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना स्वत:हूनच या परीक्षांची तयारी करावी लागत आहे.
काही शाळांमध्ये ऑनलाइन क्लासेस घेतले जातात; पण ऑनलाइन क्लासेस ऑफलाइनएवढे प्रभावी नसल्याने आणि शिष्यवृत्तीसारख्या परीक्षांची तयारी शिक्षकांच्या समोर बसूनच करणे आवश्यक असल्याने यंदा विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, असे मत महाराष्ट्र हिंदी विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र तायडे यांनी व्यक्त केले.
चौकट :
परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी-
डब्लूडब्लूडब्लू डॉट एमएससीईपुणे डॉट इन आणि डब्लूडब्लूडब्लू डॉट एमएससीईपीयूपीपीएसएस डॉट इन या वेबसाइटवर वेळापत्रक, माहिती पुस्तिका आणि अर्ज उपलब्ध आहेत. परीक्षेची तारीख लांबल्याने आता विद्यार्थ्यांना आता १० एप्रिलपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.
चौकट :
कोरोनाच्या कारणामुळे पुढे ढकलली परीक्षा
- पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी राज्यभरातून जवळपास ६ लाख विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. अर्ज भरण्यासाठी आता १० एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिल्याने परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणखीही वाढू शकते.
- औरंगाबाद जिल्ह्यातून दरवर्षी अंदाजे १० हजार विद्यार्थी ही शिष्यवृत्ती परीक्षा देत असतात.
- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात ही परीक्षा घेण्यात येते. मात्र, यंदा कोरोनामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याचे बोलले जाते.