उड्डाणपुलाला भूसंपादनाचा खोडा
By Admin | Published: May 23, 2016 01:20 AM2016-05-23T01:20:51+5:302016-05-23T01:22:34+5:30
औरंगाबाद : महावीर चौकातील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असले तरी पुलालगतच्या सर्व्हिस रोडच्या रुंदीकरणासाठी लागणारी जागा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला मिळणे सध्या तरी अवघड आहे.
औरंगाबाद : महावीर चौकातील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असले तरी पुलालगतच्या सर्व्हिस रोडच्या रुंदीकरणासाठी लागणारी जागा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला मिळणे सध्या तरी अवघड आहे. जागा मिळवून देण्यासाठी मनपा आणि रस्ते विकास महामंडळाचा पत्रव्यवहाराचा खेळ सुरू असल्यामुळे पुलाचे उद्घाटन पावसाळ्यानंतर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
रेल्वेस्टेशन ते मध्यवर्ती बसस्थानक या रोडवर तो पूल बांधण्यात आला आहे. मुळात वाहतुकीचा रेटा हा नगरनाका ते जालना रोड या दिशेने होता. त्यामुळे पूल या दिशेने बांधला जावा, अशी मागणी पुढे आली. या मागणीसाठी न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली. परंतु पुलाची दिशा बदलली नाही.
रेल्वेस्टेशन ते बसस्थानक हा रोड मनपाच्या विकास आराखड्यातील रोड आहे. त्या रोडचे रुंदीकरण करून देणे ही मनपाची जबाबदारी आहे. म्हाडा आणि बाबा पेट्रोलपंपाच्या बाजूचे दोन्ही सर्व्हिस रोड अरुंद आहेत. त्यामुळे पूल वाहतुकीस खुला व सुरळीतपणे होणे शक्य नाही. सर्व्हिस रोडचे रुंदीकरण करण्यासाठी भूसंपादन गरजेचे आहे. मनपाकडे भूसंपादन करून देण्यासाठी रक्कम नाही. टीडीआर देण्यासाठी पालिकेची तयारी आहे. परंतु जागा मालक टीडीआर घेण्यास तयार नाहीत. पुलाच्या सर्व चाचण्या झाल्या आहेत. याप्रकरणी रस्ते विकास महामंडळाने मनपा आयुक्तांना पत्रव्यवहार केला आहे.
कार्यकारी अभियंता विक्रांत जाधव म्हणाले, सर्व्हिस रोडसाठी भूसंपादन महत्त्वाचे आहे. ते झाल्यानंतर रुंदीकरण होईल. सध्या पुलाच्या लोकार्पणाची तारीख सांगणे अवघड आहे.