घाटी रुग्णालयात पद भरतीला खोडा; बारामतीसाठी मात्र पदनिर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 06:24 PM2019-03-13T18:24:09+5:302019-03-13T18:29:00+5:30
याचा रुग्णसेवेवर थेट परिणाम होत आहे.
औरंगाबाद : बारामती येथे सुरू होणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक पदनिर्मितीला मान्यता देण्यात आली; परंतु नव्याने उभारण्यात येणाऱ्या सुपरस्पेशालिटी विभागाच्या पदनिर्मितीसह घाटीतील रिक्त पदे भरण्यास मात्र वर्षानुवर्षे खोडा घातला जात आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांवर ताण वाढत असून, रुग्णसेवेवरही परिणाम होत आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) मराठवाड्यासह लगतच्या भागातून दररोज मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होतात. याठिकाणी डॉक्टर आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांमुळे रुग्णसेवेला फटका बसत आहे. बारामती येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे आणि ५०० खाटांचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होत आहे. या नव्या महाविद्यालयासाठी ५१०, तर रुग्णालयासाठी ५७१ पदांच्या निर्मितीसाठी ८ मार्च रोजी शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली.
गेल्या महिनाभरात आचारसंहितेपूर्वी नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, बारामती येथील प्रश्न, मागण्या शासन निर्णयाद्वारे मार्गी लावण्यात आले; परंतु घाटीतील प्रश्नांकडे वैद्यकीय शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.
घाटी रुग्णालयात ११७७ खाटा मंजूर आहेत. प्रत्यक्षात १५०० रुग्णांवर उपचार होतात. एकट्या बाह्यरुग्ण विभागात दररोज १९०० ते २२०० रुग्ण येतात. रुग्णालयात वर्ग एक ते चारपर्यंतच्या सातशेवर जागा रिक्त आहेत. यात एकट्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या जवळपास २५१ जागा रिक्त आहेत. ही पदे भरण्याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे.
जळगावला पळविले डॉक्टर
घाटी, कर्करोग रुग्णालयातील सहयोगी आणि सहायक प्राध्यापक असे १२ डॉक्टर आॅगस्ट-२०१८ मध्ये जळगावला पळविण्यात आले. यात बालरोग चिकित्साशास्त्र, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र, शल्यचिकित्साशास्त्र, अस्थिव्यंगोपचारशास्त्र, रोगप्रतिबंध, क्ष-किरणशास्त्र, औषधवैद्यकशास्त्र, विकृतीशास्त्र विभागांतील डॉक्टरांची बदली झाली. त्यांच्या जागी अद्याप कोणी डॉक्टर आलेले नाहीत.
‘सुपरस्पेशालिटी’ला पदनिर्मितीची प्रतीक्षा
केंद्र आणि राज्य सरकारच्या साह्याने घाटीत उभारण्यात येणारे २२० खाटांचे स्वतंत्र सुपरस्पेशालिटी विभागाचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. लवकरच हा विभाग सज्ज होणार आहे; परंतु अद्यापही या विभागासाठी पदनिर्मिती झालेली नाही. परिणामी, विभागाचे काम पूर्ण झाल्यानंतर पदनिर्मितीची प्रतीक्षा करण्याची वेळ येणार आहे.
जागा भरण्यासाठी प्रक्रिया
घाटीतील रिक्त पदे भरण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.