शहराला डेंग्यूचा ‘डंख’

By Admin | Published: September 11, 2016 01:16 AM2016-09-11T01:16:21+5:302016-09-11T01:24:19+5:30

औरंगाबाद : शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून डेंग्यूने अक्षरश: थैमान घातले आहे. प्रत्येक दहापैकी दोन घरांमध्ये डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत.

Dungyache 'duck' in city | शहराला डेंग्यूचा ‘डंख’

शहराला डेंग्यूचा ‘डंख’

googlenewsNext

औरंगाबाद : शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून डेंग्यूने अक्षरश: थैमान घातले आहे. प्रत्येक दहापैकी दोन घरांमध्ये डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. शहरातील लहान मोठ्या रुग्णालयांमध्ये डेंग्यूचे शेकडो रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. ब्लड बँकांमध्ये प्लेटलेटस् मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांनी रांगा लावल्या आहेत. एवढे असूनही महापालिका प्रशासन ठोस उपाययोजना करायला तयार नाही.
शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात तर डेंग्यूने कहरच केला आहे. रुग्णांना घाटीसह वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. घाटी रुग्णालयात सध्या सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये यश विनोद वरकड (५४, सादातनगर), सूरज श्याम बनकर (१२, सिद्धार्थनगर, हडको), परमेश्वर कड, मंगेश साळवे (२७, मयूर पार्क), नुसरत शेख (२०- एन-९), हेमंत बिस्वास (२३, न्यायनगर) यांचा समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी लेबर कॉलनी येथील साडेपाच वर्षीय माहिम सुलताना मीर असिफ अली या चिमुकलीचा डेंग्यूने मृत्यू झाला.
डॉक्टरांनी काळजी घ्यावी
शहरात प्लेटलेटस्ची वाढती मागणी लक्षात घेऊन डॉक्टरांनीही थोडीशी काळजी घ्यावी, असे आवाहन दत्ताजी भाले रक्तपेढीचे डॉ. महेंद्रसिंह चव्हाण यांनी केले. आंतरराष्ट्रीय मानकानुसार ज्या रुग्णाचे प्लेटलेटस् १० हजारांपर्यंत येत नाहीत, तेव्हापर्यंत प्लेटलेटस् देण्याची घाई करू नये. अनेक डॉक्टर २० हजारांपर्यंत प्लेटलेटस् येताच मागणी करतात. काही रुग्णांचे प्लेटलेट झपाट्याने कमी होत असल्यास त्यांना त्वरित प्लेटलेटस् देणे गरजेचेही असते.
डेंगीचा डास
डेंगीचा एडिस इजिप्त हा डास घरातील स्वच्छ पाण्यावर वाढतो. त्यामुळे घरातील पाणी झाकून ठेवावे. घराच्या परिसरातील टायर, नारळाच्या करवंट्या यात पाणी साठून तेथे या डासांची उत्पत्ती होण्याचा धोका असतो. त्यामुळे परिसरातील अशा वस्तूंची योग्य विल्हेवाट लावावी. हा डास दिवसा चावत असल्याने हात आणि पाय झाकले जातील असे कपडे वापरावे. त्यानंतरही ताप आल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन डॉक्टरांनी केले.
डेंग्यूमुळे लहान मुलांना बराच फटका बसत आहे. लहान मुलांची रुग्णालयेही हाऊसफुल आहेत. डेंग्यूवर प्रभावी असे कोणतेच औषध आज तरी उपलब्ध नाही. त्यामुळे डॉक्टर ताप कंट्रोलमध्ये आणणे, प्लेटलेटस् कमी जास्त होतात का एवढेच लक्ष ठेवून असतात. कारण डेंग्यूवर प्रभावी औषधी बाजारात उपलब्ध नसल्याचे डॉ. अभय जैन यांनी सांगितले.
70 % नमुने पॉझिटिव्ह
शहरातील वेगवेगळ्या भागांत रुग्णालयांमध्ये डेंग्यूचे रुग्ण उपचार घेत असून ७० ते ८० टक्के नमुने पॉझिटिव्ह ठरत आहेत. शहरात बऱ्यापैकी डेंग्यूने हातपाय पसरले आहेत. खाजगी रुग्णालयांमध्ये औषधोपचार व डेंग्यूच्या चाचणीसाठी रुग्णांना हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत.
१) पौष्टिक आहार घ्यावा. २) फळे, भाज्यांचे सेवन जास्त प्रमाणात करावे. ३) आहारात साखरेचे प्रमाण कमी असावे. ४) शीतपेयांचे सेवन थांबवावे.५) फास्ट फूड, गोठवलेले अन्नपदार्थ खाऊ नयेत. ६) सी जीवनसत्त्वयुक्त लिंबू, संत्री, मोसंबी, लसूण खावेत.७) टोमॅटो, बोरं, टरबूज, गाजर, कोबी, पालक यांचे सेवन करावे.
शनिवारी महापालिकेला सुटी असतानाही मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी तातडीने आरोग्य विभागाची बैठक बोलावली. बैठकीत धूरफवारणी, औषधी फवारणी युद्धपातळीवर करा असे आदेश दिले. खाजगी डॉक्टरांच्या ‘आयएमए’ संघटनेने महापालिकेला डेंग्यू जनजागृतीसाठी व्यापक प्रमाणात साहित्य दिले आहे. या साहित्याचा वापर गणेशोत्सवात करावा, असे आदेशही त्यांनी दिले. शहरात ठिकठिकाणी शमशान परवाना देण्याची व्यवस्था करावी. घाटीत जन्म-मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठी मनपाची स्वतंत्र व्यवस्था करावी, असे आदेशही बकोरिया यांनी बैठकीत दिले.

Web Title: Dungyache 'duck' in city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.