कोरोना काळात मद्यपींनी अर्थव्यवस्था तगवली,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:02 AM2021-01-21T04:02:06+5:302021-01-21T04:02:06+5:30
आता मतदारांना जागरूक करण्याची जबाबदारी मतदाता जागृती दिन : मयखान्यातून होणार १०० टक्के मतदानाचे आवाहन औरंगाबाद : कोरोना काळात ...
आता मतदारांना जागरूक करण्याची जबाबदारी
मतदाता जागृती दिन : मयखान्यातून होणार १०० टक्के मतदानाचे आवाहन
औरंगाबाद : कोरोना काळात लयास गेलेल्या अर्थव्यवस्थेस उभारी देण्याचे काम मयखान्याने इमानेइतबारे केले, हे आपण जाणतोच. त्यांच्या या कामगिरीने प्रभावित होऊन कदाचित प्रशासनाने आता मतदात्यांना जागृत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकल्याचे दिसतेय.
लोकशाहीत खरा राजा म्हणजे मतदार. या मतदारराजाने मतदानाच्या अधिकाराचा वापर निर्भीड आणि निर्भयपणे करावा, असे अपेक्षित आहे. याकरिता दरवर्षी निवडणूक आयोग २५ जानेवारी रोजी मतदाता दिन साजरा करतो. यासंदर्भात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी बैठक बोलावली. या बैठकीला शहरातील हॉटेल असोसिएशन आणि बिअर बार चालकांना निमंत्रित केले. बारमध्ये येणाऱ्या मद्यशौकिनांना मतदाता दिनानिमित्त मतदान करण्याचे महत्त्व पटवून सांगण्याचे आवाहन त्यांना करण्यात आले.
२५ जानेवारी रोजी निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती. त्यामुळे प्रजासत्ताकदिनाच्या एक दिवस आधी म्हणजे २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदाता दिन साजरा केला जातो. २०११ पासून राष्ट्रीयस्तरावर मतदाता दिन जिल्हाधिकारी स्तरावरून साजरा करण्याचे आयोगाचे निर्देश आहेत. याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी विविध विभागप्रमुख आणि शहरातील हॉटेल असोसिएशन यांची बैठक घेऊन मतदाता दिन साजरा करण्याचे आवाहन केले. मतदाता दिनाच्या कार्यक्रमात यावर्षी प्रथमच हॉटेल असोसिएशन आणि बिअर बार चालकांना सहभागी करून घेण्यात आले. हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहक मतदारामध्ये जनजागृती करण्याची जबाबदारी हॉटेल व्यवस्थापनावर टाकण्यात आली. देशातील कोणत्याही निवडणुकीमध्ये १०० टक्के मतदान होत नाही, मतदार राजा मतदानाकडे दुर्लक्ष करतो. ही बाब लक्षात घेऊन १८ वर्षांवरील व्यक्तीने मतदार यादीत नाव नोंदणी करावी, मतदानाचा हक्क
निर्भीड आणि निर्भयपणे बजवावा, असे आवाहन निवडणूक आयोगाकडून केले जाते. निर्भयपणे आणि कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान केले तर योग्य लोकप्रतिनिधी निवडून येतील आणि आपली लोकशाही अधिक बळकट होईल. ही बाब हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना पटवून सांगा, हॉटेलमध्ये याविषयीचे बॅनर पोस्टर लावा, असे आवाहन करण्यात आल्याची माहिती सूत्राने दिली. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून शहरातील परवानाधारक बिअर बार चालकांना यासंदर्भात पत्र दिले जाणार आहे.