कोरोना काळात ‘त्या’ सांभाळतात बारा गावाचे आरोग्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:05 AM2021-05-14T04:05:46+5:302021-05-14T04:05:46+5:30
नांदर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत दावरवाडी आरोग्य उपकेंद्राचा समावेश होतो. २०१३ पासून मीना कलापुरेकल यांची या आरोग्य केंद्रावर नियुक्ती ...
नांदर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत दावरवाडी आरोग्य उपकेंद्राचा समावेश होतो. २०१३ पासून मीना कलापुरेकल यांची या आरोग्य केंद्रावर नियुक्ती झाली. सुरुवातीच्या काळापासून ते आज कोरोनाच्या महामारीतदेखील त्यांच्या सेवेला तोड नाही. महिला प्रसूती, गरोदर मातांची तपासणी, सिझरियन झालेल्या महिलांची घरी जाऊन मलमपट्टी करणे, लहान मुलांचे लसीकरण करणे आदी कामे त्या न थकता करीत आहेत.
कोरोनाचे संकट आल्यानंतर त्यांनी कुटुंबीयांना सांगितले की, हा काळ वाईट आहे, या काळात आरोग्यसेवेला प्रथम प्राधान्य देणे माझे कर्तव्य आहे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्या काम करीत आहेत. दावरवाडी बरोबर अन्य दोन उपकेंद्राचादेखील अतिरिक्त कारभार त्यांच्यावर आला असून सुमारे बारा गावात नागरिकांच्या आरोग्यासाठी त्या अहोरात्र झटत आहेत. परिचारिका दिनानिमित्त दावरवाडी ग्रामपंचायतीने मीना कलापुरेकल यांचा सत्कार केला. यावेळी सरपंच शामराव तांगडे, उपसरपंच राजेंद्र वाघमोडे, आरोग्य सहाय्यक डी.टी. दिवेकर, समुदाय आरोग्य अधिकारी शाम माळी, ई. पी. ढोले, आशा कार्यकर्ता विमल चन्ने, मीना इंगळे, अनिता मंचारे, छाया राठोड यांची उपस्थिती होती.
----
पतीची मिळते साथ
कित्येक डॉक्टर, आरोग्य सेवकांना सेवा देतांंना कोरोनाने विळखा घातला. अनेकांना जीव गमवावा लागला. मात्र, आरोग्यसेवेसाठी कुटुंबाचीही पर्वा न करता मीना कलापुरेकल काम करीत आहेत. रात्री-अपरात्री गरजूंचा फोन आला तर अशावेळी त्यांचे पती त्यांना थेट रुग्णाच्या घरी घेऊन जातात. यासाठी पतीही कायम मदत करतात.