भर दुष्काळात नाथसागराची पिकांना ‘संजीवनी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 12:23 AM2019-04-02T00:23:07+5:302019-04-02T00:23:24+5:30

विक्रमी पाणीपट्टी वसूल : लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात २५० कोटींची वाढ

 During the drought, the crops of Nathasagarra are 'Sanjivani' | भर दुष्काळात नाथसागराची पिकांना ‘संजीवनी’

भर दुष्काळात नाथसागराची पिकांना ‘संजीवनी’

googlenewsNext

संजय जाधव
पैठण : भर दुष्काळातही जायकवाडी धरणातून (नाथसागर) यंदा सिंचनासाठी व बिगर सिंचनासाठी १३ टीएमसी पाणी सोडण्यात आले. जायकवाडीच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या ३८६ गावांतील शेतकऱ्यांना याचा फायदा झाला असून शेतीच्या उत्पादनात जवळपास २५० कोटी रूपयांची वाढ झाली आहे. लाभक्षेत्रात मनासारखे पाणी मिळाल्याने बळीराजानेही यंदा भरभरून पाणीपट्टीचे माप जायकवाडी प्रशासनाच्या तिजोरीत टाकले आहे. गेल्या दहा वर्षात सर्वाधिक म्हणजे २८ कोटी ३४ लाख रूपयांची पाणीपट्टी यंदा सिंचन व बिगर सिंचन क्षेत्रातून वसूल केल्याचा विक्रम जायकवाडी प्रशासनाने केला आहे.
जायकवाडी धरणात यंदा ४७ टक्के जलसाठा झाला होता. धरणात उपलब्ध असलेल्या जलसाठ्याच्या कालवा सल्लागार समितीत योग्य नियोजन करून पिण्यासाठी लागणारे पाणी राखीव ठेवत लाभक्षेत्रातील शेतकºयांसाठी कालव्याद्वारे सोडण्यात आले. जायकवाडीच्या डाव्या व उजव्या कालव्यातून १५ आॅक्टोबर, २०१८ ते १ डिसेंबर, २०१८ असे ४६ दिवसांचे पहिले आवर्तन सोडण्यात आले. या कालावधीत ७.३४ टीएमसी पाणी जलाशयातून देण्यात आले. दुसरे आवर्तन २४ जानेवारी २०१९ ते २८ फेब्रुवारी २०१९ असे ३५ दिवस सोडण्यात आले. या कालावधीत ५.६६ टीएमसी पाणी जलाशयातून खर्ची झाले.
दीड लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली
कालव्यातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे औरंगाबाद, जालना, परभणी, बीड व अहमदनगर जिल्ह्यातील जवळपास दीड लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले. लाभक्षेत्रात यंदा कापूस, कडधान्य, गहू, ज्वारी, मका, हरभरा, भाजीपाला, मिरची, हळद, ऊस, केळी, मोसंबी आदी पिकांचे उत्पादन जोरात घेण्यात आले. यंदा गहू पिकाखाली येणारे क्षेत्र एकूण लाभक्षेत्राच्या १८ टक्के एवढे होते. जायकवाडी धरणातून वेळेवर पाणी मिळाल्याने या पिकांच्या उत्पादनात वाढ झाली असल्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.
उद्दिष्ट ७ कोटींचे, वसुली २८ कोटी ३४ लाखांची
सिंचन व बिगर सिंचन या क्षेत्रातून जायकवाडी प्रशासनासमोर यंदा ७ कोटी रुपये पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी जायकवाडीचे अधिकारी व शेतकरी यांच्यात समन्वय निर्माण केल्याने तब्बल २८ कोटी ३४ लाख १२ हजार रूपयांची पाणीपट्टी जायकवाडीच्या तिजोरीत जमा झाली आहे. यात जलाशय उपसा पाणीपट्टी १ कोटी २९ लाख ८८ हजार रुपये, प्रवाही कालवा पाणीपट्टी ४२ लाख ४९ हजार, कालवा उपसा पाणीपट्टी ७ लाख ७४ हजार रुपये असे एकूण १ कोटी ८० लाख ११ हजार रुपये वसूल झाले आहेत. बिगर सिंचन प्रकारात २६ कोटी २७ लक्ष ३४ हजार रुपये व बिगर सिंचन समायोजन २६ लाख २७ हजार रुपये असे एकूण २८ कोटी ३४ लाख १२ हजार रुपये पाणीपट्टी यंदा वसूल झाली. गेल्या दहा वर्षात २००८ ते २०१८ दरम्यान १४ कोटी २७ लक्ष रुपये पाणीपट्टी वसुलीचा उच्चांक होता. यंदा मात्र तब्बल २८ कोटी रूपयांची पाणीपट्टी वसूल करुन हा उच्चांक मोडण्यात आला.
कोट...
पाणीवापर संस्था वाढवणे गरजेचे
शेतकरी व अधिकारी असे सहभागी सिंचनाचे तत्व वापरून पाण्याची बचत करून ओलीताखालील क्षेत्र वाढविण्यासाठी लाभक्षेत्रात दोन्ही कालव्यावर पाणीवापर सहकारी संस्था शेतकºयांनी स्थापन कराव्यात, असे आवाहन कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी केले आहे. लाभक्षेत्रात सध्या १३४ पाणीवापर संस्था कार्यान्वित असून या पाणीवापर संस्थेच्या सभासद शेतकºयांना जायकवाडीच्या पाण्याचा योग्य लाभ होत आहे, असेही त्यांनी सांगितले. जायकवाडी जलाशयातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
चौकट...
गेल्या दहा वर्षातील जायकवाडीची पाणीपट्टी वसुली
२००८-०९ - १४ कोटी २७ लक्ष.
२००९-१० - १२ कोटी ८२ लक्ष.
२०१०-११ - १२ कोटी ६६ लक्ष.
२०११-१२ - १३ कोटी ६२ लक्ष.
१०१२- १३ - ०९ कोटी ६० लक्ष.
२०१३-१४ - १० कोटी ९३ लक्ष.
२०१४- १५ - १२ कोटी १० लक्ष.
२०१५-१६ - ०८ कोटी ९५ लक्ष.
२०१६-१७ - ०९ कोटी२८ लक्ष.
२०१७-१८ - १२ कोटी ८३ लक्ष.
२०१८- १९ - २८ कोटी ३४ लक्ष.

 

Web Title:  During the drought, the crops of Nathasagarra are 'Sanjivani'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.