लॉकडाऊन काळात खात्यातील दोन लाख रुपये परस्पर एटीएममधून काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 08:16 PM2020-07-02T20:16:48+5:302020-07-02T20:18:34+5:30
बँकेकडून पासबुकवर सर्व व्यवहारांच्या नोंदी अद्ययावत करून घेतल्या तेव्हा लक्षात आला प्रकार
औरंगाबाद : एका महिलेच्या बँक खात्यातील २ लाख ५ हजार ३४८ रुपये एटीएममधून परस्पर काढून घेऊन फसवणूक केल्याची घटना मंगळवारी (दि.३० जून) समोर आली. महिलेने एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला.
करमाड येथील विद्या ज्ञानेश्वर कुलकर्णी यांचे भारतीय स्टेट बँकेत बचत खाते आहे. त्यांनी लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या त्यांच्या खात्यातील १ लाख ९५ हजार रुपये एसबीआय बँकेच्या खात्यात वर्ग केले. त्यामुळे त्यांच्या एसबीआयच्या खात्यात २ लाख ५ हजार ५०० रुपये रक्कम होती. त्यांचे एटीएम कार्ड दोन वर्षांपासून बंद आहे. ३० जून रोजी विद्या या काही रक्कम काढण्यासाठी आणि शिल्लक रक्कम मुदत ठेव करण्यासाठी एसबीआयच्या शाखेत गेल्या. तेव्हा त्यांच्या खात्यात केवळ दीडशे रुपये शिल्लक असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. चौकशीनंतर एटीएम कार्डचा वापर करून त्यांच्या खात्यातील रक्कम विविध वेळा काढून घेण्यात आल्याचे सांगितले. त्यांनी एमआयडीसी सिडको ठाणे गाठून तक्रार दिली. पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी सांगितले की, चौकशी सुरू केली आहे. त्यांच्या खात्यातील रक्कम ज्या एटीएम सेंटरमधून काढण्यात आली, त्या सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेज बँकेकडून मागविले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
२२ वेळा काढली एटीएममधून रक्कम
तक्रारदार कुलकर्णी यांनी बँकेकडून पासबुकवर सर्व व्यवहारांच्या नोंदी अद्ययावत करून घेतल्या तेव्हा त्यांच्या खात्यातून ६ मे ते ३० जून या कालावधीत तब्बल २२ वेळा ५ हजार, १० हजार रुपये याप्रमाणे पैसे काढलेले दिसून आले.