रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांनी ‘सब्र’ आणि ‘तखवा’धारण करावे
By मुजीब देवणीकर | Published: March 22, 2023 06:58 PM2023-03-22T18:58:49+5:302023-03-22T18:59:21+5:30
मौलाना अब्दुल रशीद मदनी यांचा सल्ला; या महिन्याचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. याच महिन्यात पवित्र धर्मग्रंथ प्रेषितांकडे सोपविण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर : दरवर्षी मुस्लिम बांधव रमजान महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. यंदा गुरुवार, २३ मार्च रोजी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर पवित्र रमजानला सुरुवात होईल. शुक्रवारी पहिला रोजा असेल. यानिमित्ताने शहरात जोरदार तयारी करण्यात येत आहे. मशिदींमध्ये रात्री ‘तरावीह’च्या नमाजसाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यादृष्टीने सर्वत्र तयारी सुरू आहे. या महिन्यात मुस्लिम बांधवांनी ‘सब्र’ (संयम), ‘तखवा’ (धार्मिकता) धारण करावे, असा सल्ला मौलाना अब्दुल रशीद मदनी यांनी दिला.
रमजान महिन्यात गरीब-श्रीमंत ही दरी आपोआप कमी होते. अल्लाहकडे सर्वच समान आहेत. या महिन्यात खुल्या मनाने माफी मागितल्यानंतर सर्व गुन्हे माफ होतात. अल्लाहने पूर्वी ५० दिवस रोजे ठेवण्याचा आदेश दिला होता. प्रेषित हजरत मोहमद पैगंबर यांनी अल्लाहला विनंती करून ३० दिवसांचे रोजे ठेवण्याची मान्यता घेतली. अल्लाहने उर्वरित २० रोजे ‘नफिल’ (ऐच्छिक) ठरविले. ऐच्छिक उपवास रमजान ईदनंतर ठेवण्याची मुभा दिली. सहा उपवास अनेक मुस्लिम बांधव ईदनंतर ठेवतात. त्याचप्रमाणे मोहर्रम, बकरी-ईद, शाबान आणि रज्जब महिन्यात उर्वरित उपवास ठेवण्यात येतात. नफिल रोजे ठेवण्याचे पुण्यही तेवढेच आहे.
यासंदर्भात मौलाना डॉ. अब्दुल रशीद मदनी यांनी सांगितले की, ७ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या प्रत्येक मुस्लिम बांधवावर ३० दिवसांचे रोजे बंधनकारक करण्यात आले आहेत. विविध आजार असतील तर अपवाद आहे, कारण नसताना रोजे न ठेवणे ही गंभीर बाब आहे. ज्यांनी उपवास ठेवले नाहीत, त्यांनी ईदच्या दिवशी रोजेदार बांधवांसोबत नमाजही अदा करू नये, असेही मौलाना रशीद मदनी यांनी नमूद केले. या महिन्याचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. याच महिन्यात पवित्र धर्मग्रंथ प्रेषितांकडे सोपविण्यात आला. मागील १४०० वर्षांपेक्षा अधिक वर्षांपासून मुस्लिम बांधव न चुकता रोजा ठेवत आहेत. या महिन्यात गोर-गरिबांना मदत करण्याचे पुण्यही बरेच आहे.
७० पट जास्त पुण्य
रमजान महिन्यात उपवास ठेवण्याची संधी मिळाली. या महिन्यात जेवढे पुण्य मिळविता येईल, तेवढे मिळविण्यात यावे. २४ तास मुस्लिम बांधवांनी ‘दर्ज’ (पठण) करीत रहावे, एका पुण्याचे महत्त्व सत्तर पुण्याईएवढे असते. मुस्लिम बांधवांनी रोजे पूर्ण करावेत.
- मौलाना रशीद मदनी