ऐन पावसाळ्यात बंधाऱ्याचे २२ लोखंडी दरवाजे चोरीला; पाणी साठवणुकीवर होणार परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 02:15 PM2024-08-27T14:15:04+5:302024-08-27T14:15:55+5:30
शिवना नदीवरील शंकरपूर बंधाऱ्याचे दरवाजे चोरी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
गंगापूर : तालुक्यातील शिवना नदीवरील शंकरपूर येथील कोल्हापुरी बंधाऱ्याचे २२ लोखंडी दरवाजे चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना २० ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी शिल्लेगाव पोलिस ठाण्यात सोमवारी (दि. २६) अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जलसंधारण विभागांतर्गत गंगापूर तालुक्यातील काटेपिंपळगाव शिवारातील शंकरपूर येथे शिवना नदीवर बंधारा आहे. या बंधाऱ्यातील पाण्यावर परिसरातील अनेक शेतकऱ्यांची सिंचनाची सोय होते. दरवर्षी पावसाळ्याच्या शेवटी या बंधाऱ्याची दरवाजे बसवून पाणी साठवणूक केली जाते. मात्र, २० ऑगस्ट रोजी या बंधाऱ्याची सुमारे २२ लोखंडी दरवाजे (किंमत १ लाख १० हजार रुपये) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.
ही बाब लक्षात येताच परिसरातील शेतकऱ्यांनी गावातील सरपंचांना याबाबत माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी पाहणी करून २१ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतच्या वतीने गंगापूर येथील उपविभागीय जलसंधारण अधिकारी कार्यालयाला पत्राद्वारे कळविले. माहिती मिळताच जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यानंतर सोमवारी सकाळी उपविभागीय जलसंधारण अधिकारी कार्यालयाच्या वतीने दिलेल्या फिर्यादीत शिल्लेगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यंदा पाणी साठवणुकीवर परिणाम
शिवना नदीवर बांधलेल्या शंकरपूर बंधाऱ्याला ८० दरवाजे आहेत. याद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी साठवणूक होऊन परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होते. मात्र, यंदा यातील २२ दरवाजे चोरीला गेल्यामुळे पाणी साठवणूक कमी प्रमाणात होणार आहे. त्यामुळे तत्काळ चोरीला गेलेले दरवाजे शोधा किंवा नवीन दरवाजे उपलब्ध करून द्या, अशी परिसरातील शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.