वर्षभरात कधी दुरुस्ती, तर कधी नादुरुस्ती, शिवाजीनगर रेल्वेगेटवर भुयारी मार्ग कधी?
By संतोष हिरेमठ | Published: June 12, 2023 12:55 PM2023-06-12T12:55:59+5:302023-06-12T12:56:34+5:30
दिवसभर वाहनचालकांची तारांबळ, हाकेच्या अंतरासाठी ५ कि.मी.चा वळसा
छत्रपती संभाजीनगर : देखभाल-दुरुस्तीसाठी शिवाजीनगर रेल्वे फाटक वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने रविवारी दिवसभर देवळाई, सातारा परिसरात ये-जा करणाऱ्या हजारो नागरिकांना फटका बसला. ऐन गेटसमोर येऊन हाकेच्या अंतरासाठी जवळपास ५ कि.मी.चा वळसा मारून संग्रामनगर उड्डाणपुलावरून ये-जा करावी लागली. या ठिकाणी भुयारी मार्ग कधी होणार, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.
दक्षिण मध्य रेल्वेतर्फे देखभाल- दुरुस्तीसाठी शनिवारी रात्री ९ वाजेपासून शिवाजीनगर रेल्वेगेट वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत हा गेट बंद ठेवण्यात येणार आहे. रविवार असल्याने नेहमीपेक्षा वाहनचालकांची वर्दळ कमी होती. मात्र, अनेकांना रेल्वे गेटच्या दुरुस्तीची माहिती नव्हती. त्यामुळे देवळाई, गारखेडा परिसरातून वाहनचालक या गेटपर्यंत येत होते. पण माघारी फिरून वाहनचालकांना संग्रामनगर उड्डाणपुलावरून ये-जा करावी लागली.
एनओसी मिळाली तर प्रश्न सुटेल
राज्यात अनेक ठिकाणी रेल्वेतर्फे भुयारी मार्गांचे काम होत आहे. परंतु राजकीय श्रेयासाठी शिवाजीनगर रेल्वे भुयारी मार्गाचा प्रश्न आजही टांगून पडलेला आहे. कधी महानगरपालिका तर कधी जिल्हाधिकारी तर कधी सा. बां. विभाग हा प्रश्न जाणून-बुजून रेंगाळत ठेवल्याचे दिसत आहे. रेल्वे विभागाला जर या तीन विभागांकडून एनओसी मिळाली तर तत्काळ भुयारी मार्ग होईल. कुणाकडे दाद मागावी हा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे.
- बद्रीनाथ थोरात, अध्यक्ष, सातारा - देवळाई जनसेवा कृती समिती
यापूर्वी शिवाजीनगर रेल्वेगेट कधी काय घडले?
- ३० जून २०२२ रोजी एका ट्रकची रेल्वेगेटला धडक. दुरुस्तीसाठी ३ तास, रेल्वेगेट बंद.
- ६ जुलै २०२२ रोजी मालवाहू वाहनाच्या धडकेने रेल्वेगेट पुन्हा नादुरुस्त.
- १ ऑगस्ट २०२२ रोजी एका वाहनाची धडक. जवळपास ५ तास वाहतुकीवर परिणाम.
- ११ मार्च २०२३ रोजी रेल्वेगेट नादुरुस्त, लोखंडी पाइप हाताने ओढून गेट उघडण्याची-बंद करण्याची रेल्वे कर्मचाऱ्यावर वेळ.