दसरा-दिवाळीची लगबग वाढली; बाजारपेठेत मिळाली हजारो बेरोजगारांना हंगामी नोकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 07:41 PM2024-09-30T19:41:27+5:302024-09-30T19:42:06+5:30
छत्रपती संभाजीनगरात दीड हजार कोटीची उलाढाल शक्य
छत्रपती संभाजीनगर : नवरात्रोत्सवापासून महासणाला सुरुवात होत आहे. दसरा- दिवाळीदरम्यान सुमारे दीड हजार कोटीची उलाढाल बाजारपेठेत होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दिवाळीनंतर लग्नसराईलाही सुरुवात होणार आहे. ऐनवेळेवर कर्मचाऱ्यांची कमतरता भासू नये म्हणून बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी नोकरभरती केली आहे.
४० हजार दुकाने, २ लाख कर्मचारी
मनपा हद्दीत लहान-मोठे ४० हजार दुकानदार आहेत. त्यांच्याकडे कायमस्वरूपी २ लाख कर्मचारी आहेत. सणासुदीच्या दिवसांत नोकरदारांची कमतरता जाणवते. यामुळे काही महिन्यांसाठी अधिकची नोकरभरती केली जाते. मागील गणेशोत्सवापासून हंगामी नोकरभरती केली जात आहे. व्यापारी महासंघाच्या प्रतिनिधींनी बाजारपेठेतील विविध क्षेत्रांतील व्यापाऱ्यांकडून आढावा घेतल्यावर १९ हजार बेरोजगारांना हंगामी नोकरी मिळाल्याचे समोर आले.
दरवर्षी होते नोकरभरती
दसरा-दिवाळीआधी दरवर्षी हंगामी नोकरभरती केली जाते. यात सर्वाधिक नोकरभरती कापड बाजारात होते. त्यानंतर किराणा, कटलरी, भेटवस्तू अन्य क्षेत्रांत नोकरभरती होते. कोरोनाकाळात निर्बंधामुळे कोणी नोकरभरती केली नव्हती; पण मागील ३ वर्षांपासून पुन्हा हंगामी नोकरभरती सुरू झाली. कोरोना काळानंतर व्यावसायिकांची संख्या १० हजारांनी वाढली. तसेच ५० हजारांनी नोकर कर्मचाऱ्यांची संख्याही वाढली.
- अजय शहा, वरिष्ठ उपाध्यक्ष, ‘कॅट’
बाजारपेठेतील स्थिती आकडेवारीत :
१) ४०,००० लहान-मोठे व्यापारी.
२) २००००० नोकर, कर्मचारी.
३) १९००० बेरोजगारांना मिळाली हंगामी नोकरी
दीड हजार कोटीची उलाढाल अपेक्षित
यंदा पावसाने मोठी साथ दिली. धरणे, तलाव तुडुंब भरली. यामुळे पाण्याची चिंता मिटली. उद्योगाला पाणी मिळेल, शेतीत रब्बी हंगामात पाणी मुबलक असणार आहे. यामुळे नवरात्रोत्सव-दसरा व दिवाळीदरम्यान शहरात यंदा दीड हजार कोटीची उलाढाल होईल, असा अंदाज आहे.
- लक्ष्मीनारायण राठी, उपाध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ