दसरा-दिवाळी ठरली १२०० कोटींची; छत्रपती संभाजीनगरवासीयांकडून मनसोक्त खरेदी
By प्रशांत तेलवाडकर | Published: November 20, 2023 05:17 PM2023-11-20T17:17:34+5:302023-11-20T17:19:55+5:30
यंदा दिवाळी पहिल्या पंधरवड्यात आल्याने नागरिकांनी महिन्याचे सामान व दिवाळीचे सामान, अशी एकत्रित खरेदी केली.
छत्रपती संभाजीनगर : ‘दिवाळ सण मोठा नाही आनंदाला तोटा’ या वाक्प्रचाराची प्रचिती यंदा आली. दसरा व दिवाळी सण धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. या उत्साहाच्या भरात नागरिकांनी तब्बल १२०० कोटींची नवीन खरेदी केल्याची माहिती कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट)च्या स्थानिक शाखेने दिली.
सर्वाधिक उलाढाल किराणा सामानात
यंदा दिवाळी पहिल्या पंधरवड्यात आल्याने नागरिकांनी महिन्याचे सामान व दिवाळीचे सामान, अशी एकत्रित खरेदी केली. जिल्ह्यात एकूण उलाढालीपैकी १७ टक्के उलाढाल किराणा सामानात झाली असून, १८० कोटींचा किराणा विक्री झाला.
कोणत्या व्यवसायात किती उलाढाल?
व्यवसाय टक्केवारी उलाढाल (रुपये)
१) किराणा १७ टक्के १८० कोटी
२) कापड १५ टक्के १५६ कोटी
३) इलेक्ट्रॉनिक्स १० टक्के १२० कोटी
४) वाहन बाजार १० टक्के १२० कोटी
५) सोने-चांदी ८ टक्के ९६ कोटी
६) फर्निचर ७ टक्के ८४ कोटी
७) मोबाइल ९ टक्के १०८ कोटी
८) भांडी बाजार ४ टक्के ४८ कोटी
९) इलेक्ट्रिकल्स ४ टक्के ४८ कोटी
१०) पेंटस् ३ टक्के ३६ कोटी
११) कटलरी ४ टक्के ४८ कोटी
१२) मिठाई ४ टक्के ४८ कोटी
१३) फटाके २ टक्के २४ कोटी
१४) अन्य ३ टक्के ३६ कोटी
१५ ते २० टक्क्यांनी वाढली उलाढाल
यंदा पावसाने मोठा फटका दिला. ऐन दिवाळीच्या तोंडावर आंदोलन, बसेस बंद यामुळे बाजारपेठेत उलाढालीला मोठा फटका बसेल, असे वाटत होते; पण शेवटच्या चार ते पाच दिवसांत मोठी उलाढाल झाली. मागील वर्षी दसरा-दिवाळीदरम्यान १०२० कोटींपर्यंत उलाढाल झाली. यंदा १२०० कोटीपर्यंत जाऊन पोहोचली. १५ ते २० टक्क्यांनी उलाढाल वाढली. तरी यात बांधकाम व्यवसायाची आकडेवारी नाही.
-अजय शहा, वरिष्ठ उपाध्यक्ष (महाराष्ट्र, कॅट)
कोरोनानंतर परिस्थिती सुधारतेय
कोविडच्या काळात व्यावसायिक उलाढालीवर मोठा परिणाम झाला होता. मात्र, आता परिस्थिती सुधारत आहे. याची अनुभूती यंदा दसरा-दिवाळीदरम्यान झाली. आता लग्नसराईचे दिवस सुरू होत आहेत. यामुळे उलाढाल वाढत राहील.
-आदेशपालसिंग छाबडा, अध्यक्ष, मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्स
बांधकाम क्षेत्रात ५०० कोटींची उलाढाल
यंदा बांधकाम क्षेत्रासाठी दसरा ते दिवाळी हा काळ सर्वाेत्तम राहिला. लोकांच्या गरजा ओळखून त्यानुसार बांधकाम व्यावसायिक बंगले, अपार्टमेंट ते टाऊनशिप उभारत आहेत. मोठ्या फ्लॅटला पसंती मिळत आहे. मराठवाडाच नव्हे तर खान्देश, विदर्भातूनही लोक शहरात गुंतवणुकीसाठी घराचा पर्याय निवडत असल्याने दसरा ते दिवाळी दरम्यान बांधकाम क्षेत्रात ५०० कोटींची उलाढाल झाली.
- विकास चौधरी, अध्यक्ष, क्रेडाई