धुळ, प्रदूषण, पर्यटकांच्या गर्दीने अजिंठा लेणीतील चित्रे संवर्धनाचे आव्हान
By संतोष हिरेमठ | Published: April 13, 2023 07:06 PM2023-04-13T19:06:07+5:302023-04-13T19:09:13+5:30
बाग लेणीप्रमाणे अजिंठा लेणीतील पेंटिंग काढून संवर्धन करण्याची वेळ येणार नाही
छत्रपती संभाजीनगर : मध्य प्रदेशातील बाग लेणीतील चित्रे काढून म्युझियममध्ये ठेवण्याची वेळ आली. तेथील खडकाच्या परिस्थितीमुळे ही वेळ आली. परंतु अजिंठा लेणीतील खडक वेगळा आहे. धुळ, प्रदूषण, पर्यटकांच्या गर्दीने अजिंठा लेणी पेंटिंग संवर्धनाचे आव्हान आहेच. परंतु बाग लेणीप्रमाणे अजिंठा लेणीतील पेंटिंग काढून संवर्धन करण्याची वेळ येणार नाही, असा विश्वास भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे संचालक (सायन्स) राम निगम म्हणाले.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षणातर्फे ‘वैज्ञानिक संवर्धन आणि पेंटिंगचे जतन’ याविषयावर आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेचे बुधवारी उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. उद्घाटनप्रसंगी गर्व्हमेंट फाॅरेन्सिक सायन्स इन्स्टिट्यूटचे संचालक डाॅ. उल्हास पाटील, कुलसचिव डॉ. भगवान साखळे, जबलपूर येथील पुरातत्व अधीक्षक शिवकांत बाजपेयी, इंदूर येथील पुरातत्व रसायनशास्त्र अधीक्षक दिनेशकुमार वर्मा, म्हैसूर येथील पुरातत्व रसायनशास्त्र अधीक्षक मांगीराम, छत्रपती संभाजीनगर येथील पुरातत्व रसायनशास्त्रज्ञ उपअधीक्षक श्रीकांत मिश्रा, पुरातत्व रसायनशास्त्रज्ञ उपअधीक्षक डाॅ. एस. विनोद कुमार, डॉ. राजेश रगडे आदी उपस्थित होते.
राम निगम म्हणाले, अजिंठा लेणी संरक्षणाचे काम केले जात आहे. हे काम अधिक चांगल्याप्रकारे होण्यासाठी ही कार्यशाळा महत्वपूर्ण ठरेल. जुन्या पद्धतीनेही चांगल्याप्रकारे काम करीत आहोत. मात्र, नवीन यंत्रसामुग्री, साहित्य वापरून हे काम अधिक चांगल्याप्रकारे होईल.
गर्दीचा डेटाही माॅनिटर करू
पर्यटकांची संख्या ही सर्वात मोठे आव्हान आहे. वारसा पाहण्यासाठी पर्यटक आले पाहिजे. त्यावर नियंत्रण ठेवले जात आहे. पर्यटक श्वास घेतात. तेव्हा ऑक्सिजन घेतात आणि कार्बनडाय ऑक्साइड सोडतात. त्यातून आर्द्रता वाढतो. परंतु तिकीट विक्री मर्यादित करून पर्यटकांची संख्या कमी करणे हा सध्या तरी पर्याय नाही. पेंटिंगच्या सुरक्षेसाठी पर्यटकांच्या गर्दीचा डेटाही माॅनिटर केला जाईल. पेंटिंगमध्ये, कलाकृतीत कोणते साहित्य आहे, हे शोधणारी यंत्रसामुग्री आली आहे. कमीत कमी हस्तक्षेप करून पेंटिंगचे संवर्धन करण्यावर भर आहे. पेंटिंग असो अथवा कलाकृती. त्याची हाताळणी करताना ते खराब होण्याचीही शक्यता असते.