उद्योगनगरीत प्रचाराचा धुराळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:05 AM2021-01-03T04:05:56+5:302021-01-03T04:05:56+5:30
ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी वाळूज महानगर : वाळूज महानगरात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या गावपातळीवरील पुढाऱ्यांनी ...
ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी
वाळूज महानगर : वाळूज महानगरात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या गावपातळीवरील पुढाऱ्यांनी सोशल मीडियावर प्रचाराचा धुराळा उडविण्यास सुरुवात केल्याचे चित्र उद्योगनगरीत पाहावयास मिळत आहे.
सध्या जिल्हाभरात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. वाळूज उद्योगनगरीतील आर्थिकदृष्ट्या सक्षम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलीच मोर्चेबांधणी केली आहे. या निवडणुकीत नामांकन अर्ज भरण्याची मुदत संपली असून, अनेकांनी नामांकन अर्ज भरल्यामुळे उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्य:स्थितीत वरचढ ठरणाऱ्या उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणात माघार घ्यावी, यासाठी सक्षम व धनदांडग्या उमेदवारांकडून त्यांची मनधरणी सुरू असून, विविध प्रकारची प्रलोभने दाखविली जात असल्याचे चित्र उद्योगनगरीत पाहावयास मिळत आहे. सोमवारी (दि.४) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने डोईजड ठरणाऱ्या उमेदवारांनी माघार घ्यावी, यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत. विरोधी गटाकडून वरचढ ठरणाऱ्या उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेऊ नये, यासाठी रसद पुरविली जात असल्याची चर्चा उद्योगनगरीत दबक्या आवाजात सुरू आहे. मातब्बर उमेदवारांनी वाॅर्डातील मतदारांच्या गाठीभेटीवर भर देत त्यांना आपल्या बाजूने वळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
चौकट.....
सोशल मीडियावरून हायटेक प्रचार
उद्योगनगरीतील संपन्न ग्रामपंचायतीत आपली वर्णी लागावी, यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. नामांकन अर्ज परत घेतल्यानंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार असले तरी बहुतांश उमेदवारांनी सोशल मीडियावर प्रचाराचा धुराळा उडविण्यास सुरुवात केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा घेत अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला प्रचार सुरू केला आहे. व्हॉट्स ॲप ग्रुप, फेसबुक पेज, इन्स्टाग्राम आदींचा आधार घेत उमेदवार प्रचार करून स्वत:ची ब्रँडिंग करून घेत असल्याचे चित्र उद्योगनगरीत पाहावयास मिळत आहे. या सोशल मीडियावर उमेदवारांकडून मतदारांना विकास कामांचे स्वप्न दाखवून त्यांना आपल्या बाजूने वळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. भरमसाठ आश्वासने मतदारांना दिली जात असून विरोधी उमेदवारांची खिल्लीही सोशल मीडियावर उडविली जात आहे. सुजान मतदारही सोशल मीडियाचा आधार घेत उमेदवारांच्या आश्वासनास तोडीस तोड उत्तरे देत असल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी सोशल मीडियावरून आपला हायटेक प्रचार सुरू केला आहे.
--------------------------