वाढत्या धुळीचा डोळ्यांना फटका, रुग्ण वाढले; अशी घ्या काळजी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 03:38 PM2023-01-04T15:38:37+5:302023-01-04T15:38:59+5:30
नेत्ररोग विभागात डोळ्यांसंबंधी विविध त्रास घेऊन दररोज मोठ्या संख्येने रुग्ण दाखल
औरंगाबाद : शहरातील वाढत्या धुळीमुळे डोळ्याच्या आजाराचे रुग्ण वाढत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले आहे. घाटी रुग्णालयातील नेत्ररोग विभागात डोळ्यांसंबंधी विविध त्रास घेऊन दररोज मोठ्या संख्येने रुग्ण बाह्यरुग्ण विभाग आणि आंतररुग्ण विभागात दाखल होत आहेत. मोतीबिंदू, नेत्र प्रत्यारोपण आदी शस्त्रक्रियाही याठिकाणी होतात.
धुळीने डोळ्यांवर परिणाम
धुळीमुळे डोळे लाल होणे, डोळ्यात काहीतरी टोचल्यासारखे वाटणे, डोळे सुजणे आदी त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे डोळ्यांची धुळीपासून काळजी घेतली पाहिजे.
- डाॅ. काशीनाथ चौधरी, नेत्ररोग विभागप्रमुख, घाटी.
अशी घ्या डोळ्यांची काळजी...
- डोळ्याची स्वच्छता राखावी, डोळ्यांच्या संरक्षणासाठी चांगल्या दर्जाचा गाॅगल वापरावा.
- दुचाकी चालविताना हेल्मेटचाही वापर करता येईल.
- डोळ्यात काही गेल्यास डोळे चोळू नये, पाणी घेऊन डोळ्यावर हबका मारणे.
- डोळ्यांना खाज येणे आदी लक्षणे दिसताच त्वरित नेत्रतज्ज्ञांकडून डोळे तपासावेत.
- डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय डोळ्यात कोणताही ड्राॅप टाकता कामा नये.