पशुपालकांसाठी आले ई-गोपाला ॲप; ‘सर्जा-राजा’ची कुंडली ठेवा आता मोबाइलवर!
By विजय सरवदे | Published: December 15, 2023 02:42 PM2023-12-15T14:42:50+5:302023-12-15T14:45:02+5:30
या ॲपद्वारे पशुपालकांना लसीकरणाचे अलर्ट, प्रजनन सेवांची उपलब्धता यासह उपचार अशा अनेक गोष्टींची माहिती एका क्लीकवर मिळणाार आहे.
छत्रपती संभाजीनगर : पशुपालकांसाठी ई-गोपाला ॲप तयार करण्यात आले असून त्यामाध्यमातून जनावरांचे आजार, त्यावरील उपचार, उत्तम प्रतीच्या प्रजनन सेवांची उपलब्धता, लसीकरणाचे अलर्ट, जनावरांच्या खरेदी-विक्रीची माहिती एक क्लिकवर मिळणार आहे. विशेष म्हणजे, या ॲपवर पशुपालकांना जनावरांचे टॅगिंगही करता येणार आहे.
काय आहे ई- गोपाला ॲप?
केंद्र सरकारने पशुपालकांच्या अडचणी सोडवण्यासाठी ई-गोपाला ॲप काढले आहे. या ॲपद्वारे पशुपालकांना लसीकरणाचे अलर्ट, प्रजनन सेवांची उपलब्धता यासह उपचार अशा अनेक गोष्टींची माहिती एका क्लीकवर मिळणाार आहे.
जनावरांचे आधार कार्ड
जनावरांचा टॅगिंग क्रमांक म्हणजेच त्याचे ते आधार कार्ड असणार आहे. जनावरांच्या कानात पिवळा टॅग बसविला जातो. त्या टॅगवर १२ आकड्याचा क्रमांक असतो. टॅगिंगचा क्रमांक देताना जनावराच्या मालकाचे नाव, आधार क्रमांक, मोबाइल नंबर, गाव, संबंधित जनावराचे किती वेत झाली, त्या जनावरला केलेले लसीकरण, वैद्यकीय उपचार, खरेदी- विक्री आदी अनेक महत्त्वाच्या नोंदी केल्या जातात. त्यामुळेच टॅगिंग क्रमांकाला आधार कार्ड म्हटले जाते. पशुसंवर्धन विभागाकडून टॅगिंगच्या नोंदी भारत पशुधन ॲपवर केल्या जातात. जिल्ह्यातील ६ लाख ३३ हजार जनावरांचे टॅगिंग करण्यात आले आहे.
जनावरांचे आजार-उपचार : या ॲपच्या माध्यमातून संबंधित जनावरावर कोणत्या आजारासाठी उपचार करण्यात आले, कोणते लसीकरण करण्यात आले, याची माहिती मिळणार आहे.
खरेदीदारांची माहिती : जनावरांची खरेदी- विक्री झाल्यास अगोदरच्या पशुपालकांकडून विकत घेणाऱ्या पशुपालकास ‘ट्रान्सफर’ अशी नोंद केली जाते.
सर्व नोंदी ठेवा मोबाइलवर : संबंधित जनावराच्या कृत्रिम रेतन, वेतानंतर जन्माला येणाऱ्या वासरांच्या नोंदी, लसीकरणाचे अलर्ट अशा अनेक माहिती या ॲपद्वारे मोबाइलवर मिळणार आहेत.
पशुधन विकास अधिकाऱ्याचा कोट
ई-गोपाला ॲप हे पशुपालकांसाठी फायदेशीर आहे. त्यामुळे सर्वच पशुपालकांनी हे ॲप मोबाइलवर डाउनलोड करावे. या माध्यमातून आपल्या जनावरांच्या उपचार, लसीकरण, उत्तम प्रतीच्या प्रजनन सेवांच्या (कृत्रिम रेतन, उत्तम प्रतीच्या वळूचे वीर्य, भ्रूण) माहितीसाठी अपडेट राहावे.
- डॉ. सुरेखा माने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी