ई-लर्निंगने नवीन क्रांती होणार
By Admin | Published: March 6, 2017 12:39 AM2017-03-06T00:39:26+5:302017-03-06T00:44:43+5:30
ज्ाालना : रोटरी क्लबने जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १८५ शाळांमध्ये अत्याधुनिक शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे या हेतूने उभारलेल्या ई-लर्निंगमुळे नवीन क्रांती होईल,
ज्ाालना : रोटरी क्लबने जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १८५ शाळांमध्ये अत्याधुनिक शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे या हेतूने उभारलेल्या ई-लर्निंगमुळे नवीन क्रांती होईल, असा विश्वास रोटरी क्लब आयोजित ई-लर्निंग लोकार्पण सोहळ्यात सर्वच मान्यवरांनी व्यक्त केला.
येथील बीज शीतलच्या सभागृहात रविवारी हा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कमलनयन बजाजचे अध्यक्ष सी.पी.त्रिपाठी, उद्योजक सुनील रायठठ्ठा, डायटचे प्राचार्य ए. बी. भटकर, उपशिक्षणाधिकारी नागेश मापारी यांच्यासह रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. नीलेश सोनी, प्रोजेक्टर चेअरमन नितीन काबरा, आदेश मंत्री, सचिव वीरेंद्र देशपांडे, उद्योजक दिनेश राठी आदींची उपस्थिती होती.
बजाज अॅटोचे सल्लागार तथा कमलनयन बजाज हॉस्पिटलचे अध्यक्ष सी. पी. त्रिपाठी म्हणाले, सामाजिक उत्तरदायित्वातून रोटरी क्लबने केलेले ई-लर्निंगचे काम कौतुकास्पद आहे. जालना हे सीड आणि स्टिलसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथे सामाजिक उपक्रमांचा पाया भक्कम आहे. ‘श्रद्धावान लभते विद्या’ या गीतेतील श्लोकाचा आधार घेऊन त्यांनी श्रद्धेने कार्य अथवा शिक्षण घेतल्यास त्यात निश्चित यश मिळते असे सांगून ई-लर्निंगमुळे शिक्षकांची संख्या कमी होईल, अशी भीती वाटण्याचे शिक्षकांना काही एक कारण नाही. बजाज समुहाकडून राबविण्यात असलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. औरंगाबाद- जालना अंतर फारसे नाही. त्यामुळे भविष्यात या समुहाकडून जालनासाठी सामाजिक मदत होऊ शकेल, असा विश्वास त्रिपाठी यांनी व्यक्त केला.
उद्योजक रायठठ्ठा म्हणाले, या रोटरी क्लबच्या माध्यमातून सर्व प्रथम जामवाडीपासून जवळ असलेल्या फुलेनगरातील शाळेला एक संगणक दिला. त्या आठवणीला उजाळा देत, रोटरी क्लबचे ई-लर्निंगचे काम विद्यार्थ्यांना नवीन प्रेरणा देणारे असल्याचे नमूद केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वप्न बघण्याचे शिकविले पाहिजे. मनी बाळगलेले स्वप्नच यशाला गवसणी घालण्यासाठी उर्जा देते. शिक्षकांनी दाखविलेले स्वप्नच मला पुढे नेत असल्याचे रायठठ्ठा यांनी सांगितले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. क्लबचे सचिव वीरेंद्र देशपांडे यांनी सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. डायटचे प्राचार्य ए.बी.भटकर यांनीही मनोगत व्यक्त केले. क्लबचे अध्यक्ष डॉ. नीलेश सोनी यांनी क्लबच्या माध्यमातून राबविण्यात येणार सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. १८५ शाळांमध्ये ई-लर्निंग सुरू केले आहे. अद्यापही ३०० शाळांनी ई-लर्निंग सुविधा करून द्यावी म्हणून अर्ज केल्याचे सांगून या उपक्रमासाठी सर्वांचेच सहकार्य लाभल्याचे सांगितले. सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन प्रोजेक्ट चेअरमन आदेश मंत्री यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. (प्रतिनिधी)