ई-पीक पेराचे मोबाइल ॲप्लिकेशन सतत हँग; लाखो शेतकरी नोंदीपासून वंचित
By बापू सोळुंके | Published: August 21, 2024 12:16 PM2024-08-21T12:16:15+5:302024-08-21T12:16:40+5:30
खरीप हंगामातील सर्वच पिकांचे उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा कमी
छत्रपती संभाजीनगर : नैसर्गिक आपत्तीत शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळविण्यासाठी ई-पीक पेराची ऑनलाइन नोंदणी बंधनकारक आहे. मात्र, यावर्षी मोबाइल ॲप्लिकेशन सतत हँग व्हायचे, यामुळे सुमारे सहा लाख खातेदार शेतकऱ्यांना ई-पीक पेराची नोंद करता आली नसल्याचे समोर आले आहे.
गतवर्षी अत्यल्प पाऊस पडला होता. यामुळे खरीप हंगामातील सर्वच पिकांचे उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा कमी झाले. कापूस आणि साेयाबीनची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघाला नव्हता. याविषयी ओरड झाल्यानंतर शासनाने कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना दोन हेक्टरपर्यंत पाच हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली. ज्या शेतकऱ्यांनी गतवर्षी ई-पीक पेरा ॲप्लिकेशनवर नोंदणी केली आहे, त्यांनाच हे अनुदान मिळेल. या निर्णयाने शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली.
१५ ऑगस्टपर्यंत होती मुदत
यावर्षी खरीप हंगामातील पिकांची ई नोंद करण्यासाठी १ ते १५ ऑगस्ट हा कालावधी दिला होता. ई-पीक पाहणी ॲप्लिकेशन अत्यंत संथपणे चालणे, अनेकदा प्रयत्न करूनही यावर शेतातील उभ्या पिकाचे छायाचित्र अपलोड न होणे, अशा समस्यांचा शेतकऱ्यांना सामना करावा लागला. शिवाय सर्वच शेतकऱ्यांकडे अँड्राॅईड मोबाईल नसल्याने त्यांना ई- पीक पाहणीची ऑनलाइन नोंदणी करता आली नाही. याबाबतच्या तक्रारी शेतकरी कृषी अधिकाऱ्यांकडे करीत आहेत. मात्र, ई-पीक पेरा ही बाब महसूल विभागाशी संबंधित असल्याचे उत्तर दिले जाते. मात्र, शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ई-पीक पेरा नोंदणी करणे आवश्यक असल्याचे अधिकारी सांगतात.
जिल्ह्यात ११.४० लाख शेतकऱ्यांचा पीक विमा
यावर्षी जिल्ह्यातील ११ लाख ४० हजार खातेदार शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला आहे. १ रुपयात पीक विमा मिळाल्याने शेतकऱ्यांनी सीएससी सेंटरवर जाऊन पीक विमा घेतला. मात्र, पीक पेरा नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना अँड्राॅईड मोबाईलसह शेतात जाऊन उभ्या पिकाचे छायाचित्र अपलोड करावे लागते. त्यावर अक्षांश, रेखांश स्पष्टपणे दिसणे आवश्यक असते. मात्र, ज्या शेतकऱ्यांकडे अँड्राॅईड मोबाइल नाही, त्यांना ही नोंदणी करता आली नाही. केवळ ५ लाख शेतकऱ्यांनीच ई-पीक पाहणी नोंदणी केली आहे.