ई-संजीवनी ओपीडी; राज्यातील ७५० रुग्णांनी घेतले घरी बसून उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 03:09 PM2020-10-30T15:09:23+5:302020-10-30T15:16:53+5:30
रुग्णांना प्रत्यक्ष रुग्णालयात जाऊन उपचार घेणे कठीण झाले होते. या पार्श्वभूमीवर २१ ऑगस्ट रोजी जिल्हा रुग्णालयात ई-संजीवनी ओपीडी सुरू करण्यात आली.
औरंगाबाद : हॅलो... डॉक्टर साहेब, घसा दुखतोय, खोकला आहे... असा संवाद जिल्हा रुग्णालयात रुग्ण आणि डॉक्टरांत होत आहे. ऑनलाईन ‘ई-संजीवनी बाह्यरुग्ण विभाग’ (ओपीडी) सेवा सुरू करण्यात आली आहे. याद्वारे आतापर्यंत राज्यभरातील ७५० रुग्णांनी अगदी घरी बसून ई-प्रिस्क्रिप्शन आणि वैद्यकीय सल्ला घेतला.
कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे रुग्णांना प्रत्यक्ष रुग्णालयात जाऊन उपचार घेणे कठीण झाले होते. या पार्श्वभूमीवर २१ ऑगस्ट रोजी जिल्हा रुग्णालयात ई-संजीवनी ओपीडी सुरू करण्यात आली. यासाठी ७ संगणकांचा विशेष कक्ष जिल्हा रुग्णालयात तयार करण्यात आला आहे. यात सकाळी ९.३० ते दुपारी १.३० वाजेदरम्यान टेलिकन्सटल्टेशनद्वारे वैद्यकीय अधिकारी गरजू रुग्णांना वैद्यकीय सल्ला देतात. डॉक्टरांशी चर्चा झाल्यानंतर रुग्णांना ई-प्रिस्क्रिप्शनही दिले जात आहे.
लॉकडाऊनचे निर्बंध आता कमी झाले आहे, तरीही ऑनलाईन वैद्यकीय सल्ला घेण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी म्हणाले, कोरोनावर उपचार घेऊन गेलेल्या रुग्णांसह इतर विविध आजारांचे रुग्ण टेलिकन्सल्टेशनद्वारे वैद्यकीय सल्ला घेत आहेत. त्यासाठी राज्यभरातून कॉल येतात.
असा घेता येईल वैद्यकीय सल्ला
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांना अँड्रॉईड मोबाईलद्वारे ‘ई-संजीवनी ओपीडी’ या संकेतस्थळावर किंवा ‘संजीवनी ओपीडी अॅप’द्वारे नोंदणी करून वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून ऑनलाईन वैद्यकीय सल्ला घेता येतो. दोन महिन्यांत आतापर्यंत औरंगाबादसह राज्यभरातील विविध जिल्ह्यांतून ७५० कॉल वैद्यकीय अधिकाऱ्यांना आले.