आधी वाढीव वीज बिलाचा ‘शॉक’, आता ग्राहकांना हप्त्याचे गाजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 01:48 PM2020-11-20T13:48:41+5:302020-11-20T13:50:05+5:30
लॉकडाऊन काळात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महावितरणने ग्राहकांच्या मीटरचे रीडिंग घेतले नाही.
औरंगाबाद : कोरोना काळात वीज बिलांचे भरमसाठ आकडे बघून वीज ग्राहकांना ‘शॉक’ बसला आहे. वीज बिल कमी करण्याची, सवलत देण्याची मागणी ग्राहकांकडून होत आहे; परंतु ही मागणी धुडकावून लावत वीज बिल अचूक असल्याचेच महावितरणकडून सांगितले जात आहे. थकीत बिल वसुलीवरच भर दिला जात असून, त्यासाठी हे बिल सुलभ हप्त्यांत भरा, असा सल्लाही दिला जात आहे.
लॉकडाऊन काळात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महावितरणने ग्राहकांच्या मीटरचे रीडिंग घेतले नाही. यादरम्यान ग्राहकांना सरासरी बिल पाठविण्यात आले. अनेकांनी त्याचा भरणादेखील केला. त्यानंतर तीन महिन्यांनी मीटरचे रीडिंग घेण्यास सुरुवात करण्यात आली. तेव्हा नेहमीपेक्षा भरमसाठ बिले आल्याच्या तक्रारी वाढल्या. या बिलात लॉकडाऊनच्या कालावधीत भरणा केलेल्या सरासरी बिलाचे कुठलेही ठोस समायोजन करण्यात आलेले नाही, असे ग्राहकांचे म्हणणे आहे.
अधिक वीज बिल आल्याच्या तक्रारी घेऊन नागरिक महावितरणच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत; परंतु त्याउलट ‘हे बिल अचूक आहे. हवे तर ते सुलभ हप्त्यांत भरा, असेच महावितरणकडून ग्राहकांना सांगितले जात आहे. सवलत मिळण्याच्या प्रतीक्षेत अनेकांनी ७ महिन्यांपासून बिलाचा भरणा केला नाही. आता सवलत दिली जाणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. ७ महिन्यांपासून थकलेल्या बिलावर व्याज लावण्यात आले. त्यामुळे वीज बिलाची रक्कम आणखी वाढत आहे. आता ही रक्कम कशी भरावी, असा प्रश्न हजारो वीज ग्राहकांपुढे उभा आहे. थकबाकीसाठी वीज कट करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली.
प्रत्येक ग्राहकाच्या तक्रारीचे निवारण केले जात आहे. अनेक जण वीज बिलाचा भरणा करीत आहेत. चांगला प्रतिसाद मिळत आहे. हप्त्यात वीज बिल भरण्याची सुविधाही दिली जात आहे.
- भुजंग खंदारे, मुख्य अभियंता, महावितरण