आधी हेरले मग चोरले...माजी कामगारांकडून साडेपाच लाख रुपये किमतीचे सुटेभाग जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 05:07 PM2018-06-05T17:07:45+5:302018-06-05T17:08:50+5:30
कंपनीत काम करताना रेकी करून नंतर तेथून वाहनांचे मौल्यवान सुटेभाग पळविणाऱ्या नवशिख्या चोरट्यांच्या टोळीतील दोघांना वाळूज एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी जेरबंद केले.
वाळूज महानगर (औरंगाबाद ) : कंपनीत काम करताना रेकी करून नंतर तेथून वाहनांचे मौल्यवान सुटेभाग पळविणाऱ्या नवशिख्या चोरट्यांच्या टोळीतील दोघांना वाळूज एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी जेरबंद केले. परिसरातील कंपन्या व ट्रॉन्सपोर्टच्या गोदामामधून दुचाकी व तीनचाकी वाहनांचे सुटेभाग चोरून या टोळीने एका ठिकाणी जमा करून ठेवले; परंतु ते विक्री करण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना अलगद अटक करून त्यांच्या ताब्यातून जवळपास साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
आन्सीराम मोरे (३०, रा. देवगाव फाटा, ता. सेलू, जि. परभणी, ह. मु. वळदगाव) व राजकुमार डुकरे (२५, रा. कळमनुरी, जि. हिंगोली, ह. मु. बजाजनगर) अशी आरोपींची आहेत. आरोपी आन्सीराम व राजकुमार हे चोरी करण्यापूर्वी त्या कंपनीत काही दिवस कामगार म्हणून काम करीत असत. काही दिवस उलटल्यानंतर कंपनीतील किमती माल कुठे ठेवला जातो, याची खातरजमा करून आरोपी कंपनीतून माल लांबवित असत. या चोरीचा संशय येऊ नये, यासाठी आरोपी कंपनीतून थोडा-थोडा माल चोरी करून माल साठवून ठेवत होते.
वाळूज एमआयडीसीतील कंपन्यांतून चोरलेला माल विक्री करण्यासाठी काही चोरटे वाळूज एमआयडीसीतील एनआरबी चौकात येणार असल्याची माहिती खबऱ्याने पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांना दिली होती. त्यावरून फौजदार अमोल देशमुख, पोहेकॉ. वसंत शेळके, पोहेकॉ. रामदास गाडेकर, पोना. प्रकाश गायकवाड, पोना. शैलेंद्र अडियाल, पोना. सुधीर सोनवणे, पोकॉ. बाळासाहेब आंधळे, पोकॉ. बाबासाहेब काकडे, पोकॉ. देवीदास इंदोरे, पोकॉ. राजकुमार सूर्यवंशी, पोकॉ. मनमोहन कोलिमी, पोकॉ. बंडू गोरे आदींच्या पथकाने सोमवारी (दि.४) दुपारी २ वाजेच्या सुमारास एनआरबी चौकात सापळा रचला. दोन संशयित या चौकात दिसताच पोलिसांनी तत्काळ त्यांना ताब्यात घेतले. सांगून साथीदाराच्या मदतीने दोन ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली पोलिसांना दिली.
गोदामातून लांबविले लाखोंचे साहित्य
या टोळीने १४ मे रोजी वाळूज एमआयडीसी परिसरातील विनय लॉजिस्टिक ट्रॉन्सपोर्ट कंपनीच्या गोदामातून ६ लाख २८ हजार रुपयांचे किमती साहित्य लांबविले होते. २९ ते ३१ मेदरम्यान या चोरट्यांनी साई-सृष्टी एंटरप्रायजेस कंपनीत चोरी करून जवळपास ५५ हजारांचा माल लांबविल्याची कबुली दिली. या दोन्ही ठिकाणांहून या टोळीने दुचाकी व तीनचाकी वाहनांसाठी लागणारे गिअर शिफ्टर गाईड, पॉप्युलर शॉफ्ट असेंब्ली, कनेक्टिंग रॉड, लोखंडी शेट मेटल आदी सुटेभाग चोरून आसेगाव शिवारातील एका पडक्या गोदामात लपवून ठेवले होते. हा ऐवज पोलिसांनी जप्त केला.
या साठविलेल्या मालाची विक्री करण्यापूर्वीच पोलीस पथकाने या टोळीचा पर्दाफाश केला. या टोळीचा मुख्य सूत्रधार व त्याचे आणखी काही साथीदार पसार असून, या टोळीकडून चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.