कानात इअरफोन अन् चपलेत आयफोन; पोलीस भरतीचा पेपर फोडणारा औरंगाबादेत अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 03:14 PM2021-12-12T15:14:19+5:302021-12-12T17:13:32+5:30
शनिवारी राज्यात कारागृह पोलीस शिपाई पदाची परीक्षा झाली, यात पेपर लीक झाल्याची घटना घडली आहे.
औरंगाबादःकाल म्हणजेच शनिवारी राज्यात अनेक ठिकाणी कारागृह पोलीस शिपाई पदाची परीक्षा झाली. त्या लेखी परीक्षेचा पेपर लीक केल्याप्रकरणी एका उमेदवाराला औरंगाबाद पोलिसांनी अटक केली आहे. विकास परमसिंग बारवाल असे प्रश्न पत्रिका लीक करणाऱ्या उमेदवाराचे नाव आहे. तो जालना येथील अंबड तालुक्याचा रहिवासी आहे. पोलिसांनी त्याच्याकडून आयफोन आणि अत्यंत छोटे इअरफोन्स जप्त केले आहेत.
पोलिसांकडून मिळलेल्या माहितीनुसार, औरंगाबादच्या लालटाकी रोड परिसरातील केंद्रावर हा प्रकार घडला. परीक्षा सुरू झाल्यानंतर एका कक्षात सुपरवायझरला विकासकडे मोबाइल असल्याचे आढळून आले. तसेच त्याच्या कानात छोट्या आकाराचे इअरफोन्स असल्याचे आढळले. विकासने एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर प्रश्नपत्रिकेचा फोटो पाठवला होता. तोफखाना पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.
याशिवाय, औरंगाबादमधील जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयभवानी शाळेच्या केंद्रात अशाच प्रकारची एक घटना घडली आहे. सोमनाथ विठ्ठल मोरे नावाच्या तरुणाने शर्टच्या आत एक टीशर्ट घातला होता. त्याला आतून पाकीट बनवून त्यात मोबाइल, मास्टरकार्ड म्हणजेच ब्लूटूथ कनेक्टर डिव्हाइस बसवलेले होते. तर कानात ज्वारीच्या दाण्याएवढे इअरफोन लपवलेले होते. या तरुणालाही पोलिसांनी अटक केले आहे.
म्हाडाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या
आज म्हाडाची परीक्षा होणार होती, पण ऐनवेळी ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. आरोग्य विभागातील भरतीकरिता परीक्षा झाल्या आणि पेपर फुटीचे प्रकरण ताजे असताना, म्हाडा भरतीमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कानावर आल्या आहेत. या तक्रारींची गंभीर दखल घेत आव्हाडांनी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले. तसेच, या प्रकरणातील दोषींना सोडले जाणार नाही असा सज्जड दमही दिला.
"काही अपरिहार्य आणि तांत्रिक अडचणींमुळे म्हाडा आणि इतर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता या परीक्षा जानेवारी महिन्यात होणार आहेत. ऐन वेळी परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांची जी गैरसोय होणार आहे, त्याबद्दल मी क्षमा मागतो. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी. कोणत्याही विद्यार्थ्याने परीक्षा देण्यासाठी सेंटरवर जाऊ नये, गाव सोडू नये" असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. ट्विटर अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करुन त्यांनी याबाबत माहिती दिली.