'भूकंप, प्लेग व कोरोना'; ७४ वर्षांत चौथ्यांदा भरली नाही कर्णपुरा यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2021 11:48 AM2021-10-08T11:48:08+5:302021-10-08T11:49:48+5:30
Navratri : नवरात्रोत्सवात कर्णपुरातील हा परिसर आकाशपाळणे व विविध करमणुकीची साधने, दुकानांनी गजबजून गेलेला असतो. मात्र, यंदा यात्रा रद्द करण्यात आल्याने परिसरात शुकशुकाट दिसत आहे.
- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : नवरात्रोत्सव ( Navratri ) व कर्णपुरा यात्रा ( Karnapura Yatra ) हे समीकरण झाले आहे. मात्र, गुरुवारी पहिल्या माळेला जेव्हा भाविक कर्णपुरा देवीच्या दर्शनाला जात होते, तेव्हा त्यांना कर्णपुऱ्यातील मोकळे मैदान पाहून काहीतरी हरवल्यासारखे जाणवत होते. कोरोनामुळे (Corona Virus ) यंदा येथील यात्रा भरली नाही. पण, यात्रा न भरण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी स्वातंत्र्यप्राप्तीपासून म्हणजे मागील ७४ वर्षांत चार वेळा कर्णपुरा यात्रेला खंड पडला आहे. यंदा यात्रा भरली नसली, तरी थेट मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेता येत असल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले.
स्वातंत्र्यापूर्वी येथे छोट्या प्रमाणात यात्रा भरत असे; पण नंतर जसजशी लोकसंख्या वाढत गेली व शहराचा विस्तार होत गेला, तसतसा कर्णपुरा यात्रेचा आकारही वाढत गेला. कोरोनामुळे मागील वर्षी व यंदा कर्णपुरा यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यापूर्वी ३० सप्टेंबर १९९३ मध्ये किल्लारीचा भूकंप झाला होता. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात यात्रा भरविण्यात आली नव्हती. दुसऱ्या वर्षी सप्टेंबर १९९४ मध्ये सुरतमध्ये प्लेगची साथ आली होती. त्याही वर्षी ही यात्रा रद्द करण्यात आली होती, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते करणसिंह काकस यांनी दिली.
एकदाच घडले नाही देवीचे दर्शन
किल्लारीचा भूकंप, सुरतमधील प्लेगच्या साथीमुळे सलग दोन वर्षे यात्रा रद्द करण्यात आली होती. पण, भाविकांना तेव्हा देवीच्या दर्शनासाठी परवानगी देण्यात आली होती. यंदाही यात्रा रद्द झाली असली, तरी पहिल्या माळेपासून भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले आहे. फक्त २०२० मध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या अधिक होती. यामुळे यात्राच नव्हे, तर मंदिरही बंद ठेवण्यात आले होते. भाविकांना त्याच एका वर्षी देवीचे दर्शन घेता आले नाही.