लग्न करणे सोपे, विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळविणे तेवढेच अवघड!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 06:40 PM2022-04-28T18:40:00+5:302022-04-28T18:40:34+5:30
महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयांमध्ये उंबरठे झिजवावे लागतात
औरंगाबाद : कोरोना संसर्गानंतर तर लग्न समारंभ अत्यंत छोटेखानी स्वरूपात उरकण्यावर भर देण्यात येत आहे. लग्न करणे सोपे आणि नंतर विवाह प्रमाणपत्र मिळविणे अवघड अशी परिस्थिती सध्या शहरात निर्माण झाली आहे. महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयांकडे सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही अनेक दिवस प्रमाणपत्र मिळत नाही. वरिष्ठ अधिकारी प्रमाणपत्रावर वेळेवर सह्याच करीत नाहीत, त्यामुळे सर्वसामान्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय.
अलीकडे अनेक ठिकाणी लग्न प्रमाणपत्राची मागणी केली जाते. कायद्याच्या दृष्टीनेही हे प्रमाणपत्र महत्त्वाचे असते. लग्न झाल्यानंतर विविध कागदपत्रांसह मनपाच्या वॉर्ड कार्यालयात अर्ज दाखल करावा लागताे. शहरात महापालिकेची नऊ झोन कार्यालये आहेत. लग्न कोणत्या झोनच्या हद्दीत झाले त्यावरून संबंधित झोनवर जबाबदारी निश्चित केलेली आहे. महापालिकेने लग्न प्रमाणपत्रासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर विकसित केले आहे. महापालिकेच्या फक्त झोन ब कार्यालयात किमान १० दिवसांमध्ये प्रमाणपत्र देण्यात येते. इतर वॉर्ड कार्यालयांमध्ये किमान दीड ते दोन महिने नागरिकांना चकरा माराव्या लागतात.
कोणती कागदपत्रे आवश्यक
जन्माचा दाखला, शाळेची टी.सी. लाइट बिल, फोन बिल, रेशनकार्ड, आधार, निवडणूक कार्ड, पाच पासपोर्ट फोटो, ४ बाय ६ आकाराचा मुलाचा-मुलीचा फोटो, ३ साक्षीदार, मालमत्ता कर, पाणीपट्टी भरलेले प्रमाणपत्र.
विवाह नोंदणी प्रमाणपत्र कसे काढाल?
फॉर्म भरल्यानंतर महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयात विविध कागदपत्रांसह तो सादर करावा. २० दिवसात प्रमाणपत्र देणे संबंधित वॉर्ड कार्यालयाला बंधनकारक केले आहे.
६५ ते २१५ रुपये खर्च
लग्न झाल्यानंतर ३ महिन्यांसाठी ६५ रुपये, ३ ते ९ महिने लग्नाला झाल्यास ११५ रुपये, ९ महिन्यांपेक्षा जास्त अवधी असेल तर २१५ रुपये फी आकारली जाते.
एजंट हा प्रकार नाही...
महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयांमध्ये एजंट हा प्रकार नाही. मात्र, वॉर्डातील संबंधित कर्मचाऱ्यांकडूनच दिरंगाई केली जाते. कागदपत्रांची तपासणी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांसमक्ष करावी लागते. अनेकदा संबंधित अधिकारीच उपलब्ध नसतात.
किमान दोन महिने लागतात
महापालिकेच्या नऊपैकी आठ वॉर्ड कार्यालयांमध्ये किमान २ महिने तरी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी लागतात. काही ठिकाणी कागदपत्रांची पूर्तता करा म्हणून आणखी वेळ लावण्यात येतो.
एक महिन्यापासून सॉफ्टवेअर बंद
महापालिकेचे जुने सॉफ्टवेअरच एक महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे महिनाभरात एकही प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेले नाही. स्मार्ट सिटीमार्फत नवीन सॉफ्टवेअर तयार करण्यात आले खरे, पण ते अद्याप सुरू झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.