पावसाळ्यात आवर्जून खा आरोग्यदायी रानभाज्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:02 AM2021-07-02T04:02:01+5:302021-07-02T04:02:01+5:30
औरंगाबाद : पावसाळ्यात सगळीकडे रानभाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. प्रत्येक प्रांतातल्या रानभाजीची वेगळीच खासियत असते आणि त्यात अनेक पौष्टिक ...
औरंगाबाद : पावसाळ्यात सगळीकडे रानभाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. प्रत्येक प्रांतातल्या रानभाजीची वेगळीच खासियत असते आणि त्यात अनेक पौष्टिक गुणधर्मही दडलेले असतात. त्यामुळे पावसाळ्यात रानभाज्यांच्या रूपात मुबलक प्रमाणात उपलब्ध असणारा हा आरोग्याचा ठेवा चुकवू नये, असाच आहे.
हल्ली कोरोनामुळे तर प्रत्येक जण आराेग्याबाबत जागरूक झालेले आहेत. जेवढे काही नैसर्गिक असेल, ते खाण्याकडे प्रत्येकाचा कल आहे. त्यामुळे रानभाज्यांविषयीची जागृतीही मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. त्या-त्या प्रांतातल्या खनिजांनी समृद्ध असणे, हे रानभाज्यांचे वैशिष्ट्य आहे. रानभाज्यांमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस अशी शरीराला ऊर्जा देणारी खनिजे मोठ्या प्रमाणावर असतात.
रानभाज्यांच्या सेवनाने शरीर लवचीक बनते तसेच त्यांच्यातील औषधी गुणांमुळे अनेक जुनाट आजारही बरे होतात. रानभाज्यांमध्ये फायबरचे प्रमाण खूप असते. त्यामुळे रानभाज्या खाल्ल्याने शरीरातील चरबी वाढत नाही. रानभाज्या नियमितपणे खाणाऱ्या व्यक्ती काटक असतात. हाडांचे पोषण आणि हाडांना मजबुती देण्याचे काम रानभाज्या करतात. करटोली, अंबाडी, माठ, शेवगा, हादगा, कुर्डू, अळू, घोळ, भोकर, मोखा अशा अनेक रानभाज्या सध्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत.
चौकट :
रानभाज्या कशा खाव्यात ?
रानभाज्यांच्या मूळ चवीला धक्का न लागू देता आणि त्यांच्यातील पोषण मूल्ये कमी न करता रानभाज्या खाल्ल्या पाहिजेत. रानभाज्या बनविताना पुदिना, कैरी, लिंबू टाकून त्यांची पोषण मूल्ये अधिक वाढविता येतात. या भाज्यांसोबत पोळ्यांऐवजी भाकरी खाणे अधिक आरोग्यदायी असते. भाकरी तांदळाची किंवा नाचणीची असेल तर उत्तम. उडीद आणि ज्वारी यांचे पीठ एकत्रित करून बनविलेली कळण्याची भाकरी रानभाज्यांसोबत खाणे केव्हाही अधिक चांगले.
- डॉ. अलका कर्णिक, आहारतज्ज्ञ.
चौकट :
रानभाज्या करताना ही काळजी घ्या
एरवी आपण ज्या भाज्या खातो, त्या वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. परंतु रानभाजी बनविण्याची योग्य पद्धत त्या-त्या प्रांतातल्या लोकांकडून जाणून घेतली पाहिजे. याचे सगळ्यात मुख्य कारण म्हणजे कोणत्या भाज्यांमध्ये काय असते आणि त्याचा आपल्या तब्येतीवर कोणता परिणाम होईल, हे आपल्याला माहीत नसते. काही रानभाज्यांमध्ये काही विषारी घटकही असतात. जेव्हा आपण ती भाजी व्यवस्थित शिजवून, वाफवून घेतो किंवा त्यामध्ये एखादा नवा घटक टाकतो, तेव्हा तिच्यातले विषारी घटक कमी होतात आणि ती भाजी खाण्यायोग्य बनते. तसेच ती खाणाऱ्याला कोणत्याही प्रकारे बाधत नाही. त्यामुळे रानभाजी बनविताना कोणतेही प्रयोग करणे टाळावे.
फोटो ओळ :
पावसाळ्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या रानभाज्या.