हॉटेलमध्ये जेवायला जाणे महागात; चोरट्याने घर फोडले
By राम शिनगारे | Published: December 15, 2022 09:12 PM2022-12-15T21:12:12+5:302022-12-15T21:12:24+5:30
नक्षत्रवाडीतील घटना : दीड तासात घर फोडून दागिने लंपास
औरंगाबाद : हॉटेलात जेवायला जाणे एका कुटुंबास चांगलेच महागात पडले. आवघ्या दीड तासात चोरट्याने घर फोडून घरातील ६७ हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना नक्षत्रवाडीत बुधवारी सायंकाळी ७.३० ते ९ वाजेच्या दरम्यान घडली. या प्रकरणी सातारा ठाण्यात गुन्हा नोंदवला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किरणसिंग रगबनशी राजूपत (रा. फ्लॅट क्र. १०३, अश्विनी बिल्डिंग, नक्षत्र अंगण, हिंदुस्तान आवास, पैठण रोड, नक्षत्रवाडी) हे फ्लॅटच्या लोखंडी दरवाज्याला कुलूप लावून कुटुंबियांसह सायंकाळी साडेसातच्या सुमारास हॉटेलात जेवायला गेले होते. ही संधी साधून चोराने कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले दोन तोळ्याच्या चार अंगठ्या, पाच ग्रॅमचे मंगळसूत्र, ३ ग्रॅमचे दोन टॉप्स आणि एक ग्रॅमच्या चार बांगड्या असा ६७ हजारांचा ऐवज लंपास केला.
रात्री साडेनऊच्या सुमारास राजूपत कुटुंबीय घरी परतले तेव्हा त्यांना कुलूप तुटलेले दिसून आले. आत जाऊन पहिले असता चोरी झाल्याचा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी तात्काळ सातारा पोलिसांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक तपास उपनिरीक्षक संभाजी गोरे करीत आहेत.