अभियांत्रिकी महाविद्यालयांचे अर्थचक्र बिघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:06 AM2021-01-13T04:06:55+5:302021-01-13T04:06:55+5:30
औरंगाबाद : इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू झाले. पर्यटन, मनोरंजन, बाजारपेठांसह सर्वच क्षेत्र खुली झाली. मात्र, ...
औरंगाबाद : इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू झाले. पर्यटन, मनोरंजन, बाजारपेठांसह सर्वच क्षेत्र खुली झाली. मात्र, अद्याप राज्यात अभियांत्रिकीचे महाविद्यालये सुरू करण्याबाबत राज्य शासनाकडून कोणताही निर्णय होत नसल्याने महाविद्यालयांसह अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे. या महाविद्यालयांचे गेल्यावर्षीपासून विविध शिष्यवृत्तीचे देय देयके थकीत असल्याने महाविद्यालयांचा कारभार हाकावा, कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडल्याने त्यांची जगण्यासाठी धडपड सुरू आहे. त्यामुळे अभियांत्रिकी महाविद्यालये तत्काळ सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.
गेल्या आठ महिन्यांपासून ३० टक्के महाविद्यालयांनी लाॅकडाऊनच्या काळात काही महिने अर्धा पगार कसाबसा प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिला. तो ही सध्या देणे शक्य होत नाही. काही महाविद्यालयांनी कर्ज काढून कर्मचाऱ्यांचा पगार दिला. ऑनलाईन वर्ग सुरु असले तरी प्रात्यक्षिक व प्रत्यक्ष वर्गातील शिक्षणाची त्यात सर नाही. आत्मनिर्भर होण्याचा नारा देताना त्यासाठीचा कणा कुशल अभियांत्रिकीचा विद्यार्थी यात दुर्लक्षित झाला आहे. कोरोनाच्या लाॅकडाऊन काळात पहिले व दुसरे सेमिस्टर गेले. तिसरे सेमिस्टर सुरू होत असताना आता तरी तत्काळ ही महाविद्यालये सुरू व्हावीत. याबाबतचा राज्य शासनाने निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत अभियांत्रिकीचे प्राध्यापक, प्राचार्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.
महासीईटी सेलच्या आकडेवारीनुसार राज्यात शासकीय अभियांत्रिकीचे १८ महाविद्यालये, खासगी ३१३ अभियांत्रिकी महाविद्यालये यात २४ हजार ७७६ प्राध्यापक, ३७ हजार १६४ शिक्षकेतर कर्मचारी अवलंबून आहेत. पहिल्या वर्षांच्या प्रवेशाची क्षमता १ लाख २३ हजार ८९५ असून चार वर्षांत ४ लाख ९५ हजार ५८० विद्यार्थी शिकतात. त्यांच्या भविष्याचा विचार व्हावा, अशी मागणी अभियांत्रिकी महाविद्यालयांकडून होत आहे.
---
मनुष्यबळाने जगावे तरी कसे
पुणे विद्यापीठाने ११ जानेवारीपासून महाविद्यालये सुरू करण्याची तयारी केली असता त्यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ मिळाली. राज्य शासन निर्णय घेत नाही. विद्यापीठांनाही महाविद्यालये सुरू करू देत नाही. आठ महिन्यांपासून महाविद्यालये सुरू झाले नाहीत. शासनाकडून गेल्यावर्षीपासून प्रलंबित देय प्रतिपूर्तीची रक्कम अद्याप मिळाली नाही. एका-एका महाविद्यालयाचे कोट्यवधी रुपये शासनाकडून येणेबाकी असल्याने अभियांत्रिकी महाविद्यालये आर्थिक संकटात सापडली असून त्याचा फटका तेथील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही बसला आहे. या प्राध्यापक कर्मचाऱ्यांनी जगावे तरी कसे, असा सवाल अभियांत्रिकीचे सल्लागार समितीचे संचालक महेश पाटील यांनी उपस्थित केला.
--
कोट
---
महाविद्यालये तत्काळ सुरू करावीत
बाजारपेठा, रेल्वे बसमध्ये उभे रहायला जागा नाही. सर्वच क्षेत्र सुरू झाले. नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. मग अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू करण्यात अडचण काय आहे. हे कोडे अद्याप उलगडले नाही. अर्थकारण खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांचे मुलांच्या शुल्कावर अर्थचक्र अवलंबून असते. महाविद्यालये सुरू नसल्याने सर्व गाडा ठप्प झाला आहे. ही महाविद्यालये तत्काळ सुरू करून यांची प्रलंबित देयके तत्काळ दिली जावीत.
-महेश पाटील, अभियांत्रिकी सल्लागार समिती संचालक
पाॅईंटर
खासगी अभियांत्रिकी महाविद्यालये- ३१३
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये -१८
प्रथम वर्षाची प्रवेश क्षमता- १, २३, ८९५
सर्व महाविद्यालयात चार वर्षांत ४ लाख ९५ हजार ५८०
प्राध्यापकांची संख्या - २४ ७७६
शिक्षकेतर कर्मचारी- ३७, १६४