आडूळच्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांची आर्थिक लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 01:30 AM2018-07-30T01:30:09+5:302018-07-30T01:31:01+5:30
आडूळ येथील विनाअनुदानित संत ईश्वरसिंह कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांची लूट करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
राम शिनगारे/ अंकुश वाघ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिल्ह्यातील आडूळ येथील विनाअनुदानित संत ईश्वरसिंह कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांची लूट करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब कॅमेऱ्यात कैद झाली आहे. विद्यार्थ्यांकडून पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ५ ते १० हजार रुपये घेण्यात आले आहेत. या पैशाची पावतीही विद्यार्थ्यांना दिलेली नाही. पावती मागितल्यास विद्यार्थ्यांना प्रवेशच देण्यात येत नसल्याचेही समोर आले आहे.
आडूळ येथे बळीराम नाईक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित संत ईश्वरसिंह कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अव्वाच्या सव्वा शुल्क आकरण्यात येत असल्याचे ‘लोकमत’ने के लेल्या स्टिंगमध्ये समोर आले आहे. या महाविद्यालयात गावातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यास त्यांच्याकडून ५ हजार रुपये, शेजारील गावातील विद्यार्थ्यांकडून ६ ते ७ हजार रुपये आणि जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांकडून १० हजार रुपये शुल्क घेण्यात येत असल्याची तक्रार अखिल भारतीय मीणा महासभा संघटनेतर्फे विद्यापीठाकडे ४ जुलै रोजी केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये विद्यार्थ्यांकडून ५ हजार रुपये शुल्क घेण्यात येत असल्याचे कॅमेºयात कैद झाले. विशेष म्हणजे यात प्रवेशासाठीची कागदपत्रे आणि पैसे दस्तुरखुद्द प्रभारी प्राचार्यच घेत असल्याचे दिसून आले. प्राचार्य विद्यार्थ्यांकडून पाच हजार रुपये घेताना दिसतात. पैसे घेतल्यानंतर त्याची कोणतीही नोंद किंवा पावती दिली जात नाही. एका विद्यार्थ्याने परीक्षा शुल्क कमी करण्याची विनंती केली. तेव्हा प्राचार्य सांगतात, ६ ते ७ हजार रुपये फी ही बालवाडीतील प्रवेशासाठी घेतली जाते. हे तर उच्चशिक्षण देणारे महाविद्यालय आहे. पाच हजार रुपयांच्या फीमध्ये एकही रुपया कमी होणार नाही. यानंतर हा विद्यार्थी हिरमुसल्या तोंडाने बाहेर पडतो. प्राचार्य अॅडमिशनचे अर्ज तपासण्याच्या कामात व्यस्त होतात. विद्यार्थ्यांचे प्रवेश घेण्यासाठी थेट प्राचार्यांनाच बसावे लागते. या महाविद्यालयात लिपिकसुद्धा नसल्याचे दिसून येत आहे.
प्रवेश अर्ज भरा अन् परीक्षेला या
या महाविद्यालयात थेट औरंगाबाद, ठाणे, पुणेपासून ते महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे. एकदा प्रवेश घेतला की थेट परीक्षेला येण्याची मुभा महाविद्यालयात मिळत असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे महाविद्यालयात ना तास होतात ना प्राध्यापक आहेत. जे प्राचार्य विद्यार्थ्यांकडून पैसे घेतात. तेसुद्धा प्रभारी असून, त्यांचीही पात्रता शंकास्पद आहे. याचवेळी परीक्षेत १०० टक्के कॉपी करण्याची हमी मिळत असल्यामुळे कागदोपत्री सर्व सोपस्कार पूर्ण केले जात असल्याचेही स्पष्ट झाले.