ज्ञानराधाच्या शाखांवर ईडीच्या धाडी; अन्य व्यवसायांचाही तपास करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 12:06 PM2024-08-13T12:06:34+5:302024-08-13T12:07:13+5:30
बीड, पुणे, नवी मुंबईच्या शाखांवर धाडी, सुरेश कुटेचे १.२ कोटी रुपये, डीमॅट खाते गोठवले
छत्रपती संभाजीनगर : ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या पुणे, नवी मुंबई व बीडमधील शाखांमध्ये ईडीने धाडी टाकल्या. बँक निधीच्या स्वरूपातील चल मालमत्तेसह १.२ कोटी रुपये व डीमॅट खाते गोठवण्यात आले आहे.
सक्तवसुली संचालनालय (ईडी) या केंद्रीय तपास यंत्रणेने गारखेड्यातील संस्थेच्या विभागीय कार्यालयात शनिवारी धाडी टाकत संगणकातील महत्त्वपूर्ण डेटा हस्तगत केला. शुक्रवारी मध्यरात्री १.३० वाजता ही कारवाई सुरू होती. त्यानंतर संस्थेच्या बीड, पुणे, मुंबई व नवी मुंबईतील शाखांवर धाडी टाकल्या. तेथून पथकाने संगणकाच्या हार्ड डिस्कसह विविध दस्तऐवज, डिजिटल उपकरणे जप्त केली. त्यानंतर पीएमएलए, २०२२च्या तरतुदींनुसार बँक निधीच्या स्वरूपात चल मालमत्ता, अंदाजे १.२ काेटी रुपये, डीमॅट खाते गोठवले.
अन्य व्यवसायांचा तपास करणार
ज्ञानराधाच्या सुरेश कुटेने १२ ते १३ टक्के व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांकडून कोट्यवधींच्या ठेवी घेतल्या. या संस्थेसह कुटेचे तिरुमला ऑइल, दुग्ध व्यवसाय, ऑटोमोबाइल इंजिनिअरिंगसारख्या विविध कंपन्या आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांकडून आता त्याच्या या अन्य व्यवसायांमधील व्यवहारदेखील तपासला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.