महापालिकेत ‘ईडी’ची झाडाझडती; रात्री उशिरापर्यंत घेतली योजनेची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 07:12 PM2023-03-18T19:12:30+5:302023-03-18T19:15:01+5:30
महापालिकेच्या इतिहासात प्रथमच ‘ईडी’चे अधिकारी रात्री महापालिकेत दाखल झाल्याने जोरदार चर्चा सुरू झाली.
छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत निविदा प्रकरणाशी संबंधित कंत्राटदारांच्या घरांवर शुक्रवारी सकाळीच ‘ईडी’ने धाडी टाकल्या. दिवसभर खोदकाम केल्यानंतर पथकातील एक अधिकारी सायंकाळी महापालिकेत दाखल झाले. त्यांनी अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, उपायुक्त अपर्णा थेटे, घरकूल योजनेचे प्रमुख खमर शेख आदींकडून संपूर्ण योजनेचा तपशील जाणून घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
पंतप्रधान आवास योजनेच्या निविदा प्रक्रियेसाठी तत्कालीन प्रशासक यांनी अधिकाऱ्यांची एक समिती गठीत केली होती. समितीच्या मंजुरीनंतर ‘समरथ कन्स्ट्रक्शन’ या कंपनीला वर्क ऑर्डर देण्यात आली होती. महापालिका प्रशासनाने निविदा कशा पद्धतीने प्रसिद्ध केली, एकूण किती निविदा आल्या होत्या, अपात्र निविदाधारक किती होते, प्रकल्पाची एकूण किंमत, कंपनीने काम मिळविण्यासाठी कोणती कागदपत्रे लावली, या कागदपत्रांची पडताळणी कशा पद्धतीने मनपाने केली, कंत्राटदाराने घरांसाठी किंमत कशा पद्धतीने निश्चित केली, अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती ईडी अधिकाऱ्याने केल्याचे कळते.
मनपात एकच खळबळ
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ‘ईडी’चे पथक शहरात दाखल झाल्याची वार्ता सकाळीच मनपा अधिकाऱ्यांनाही लागली होती. महापालिकेतही पथक येणार का? अशी विचारणा अधिकाऱ्यांकडून एकमेकांना करण्यात येत होती. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच ‘ईडी’चे अधिकारी रात्री महापालिकेत दाखल झाल्याने जोरदार चर्चा सुरू झाली.
मनपा प्रशासक बाहेरगावी
महापालिका प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्यासोबत ‘ईडी’ अधिकाऱ्यांनी यापूर्वी दूरध्वनीवर संपर्क साधला होता. आवास योजनेतील अनेक पैलूंवर चर्चाही केली होती. गुरुवारी सकाळीच ते बाहेरगावी रवाना झाले. शुक्रवारी सकाळी धाडसत्र शहरात सुरू झाले.